हिंगोली: सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी येथील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत मंजूर विहिरींच्या कामात मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर सेनगाव पंचायत समितीतील तांत्रिक सहाय्यक के. बी. देशपांडे यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या कथित बेहिशोबी मालमत्तेची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी, अशी लेखी मागणी तक्रारदार रामचंद्र शंकर खडसे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) कडे केली आहे. या घडामोडींमुळे जिल्हा प्रशासन पुढे कोणती ठोस कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

धनगरवाडी शिवारात अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ८५ विहिरी मंजूर झाल्या होत्या. मात्र त्यापैकी अनेक विहिरी प्रत्यक्षात अस्तित्वात नसतानाही कागदोपत्री पूर्ण दाखवून लाखो रुपयांचा निधी काढल्याचा आरोप आहे. प्रारंभी रामचंद्र खडसे यांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर चौकशीसाठी पाठविण्यात आलेल्या नायब तहसीलदार नकुल वाघुंडे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली तक्रारीत तथ्य असून शेतात विहीर नसल्याची कबुली वाघुंडे यांनी दिल्याने विहिरीतील गैरप्रकार उघडकीस आला.अन् प्रकरणाला वाचा फुटली.

यानंतर गणेश रवणे, सयाबाई जगताप, इंदुबाई खडसे, एकनाथ कोल्हे, विठ्ठल विरकर आणि श्रीराम जगताप या लाभार्थी शेतकऱ्यांनीही लेखी तक्रारी सादर करून निधी मजुरांच्या नावावर लाटल्याचा आरोप केला. प्रत्यक्ष अंमलबजावणीत त्रुटी, मस्टर नोंदीतील संशयास्पद नोंदी आणि कामांतील हलगर्जीपणा याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असताना आता परत अल्पभूधारक शेतकरी रामचंद्र खडसे यांनी सेनगाव पंचायत समिती अंतर्गत कार्यरत तांत्रिक सहाय्यक के बी देशपांडे यांच्या भ्रष्ट कार्यपद्धतीची व बेहिशोबी मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी केल्याचे समोर आली आहे.या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद हिंगोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गायकवाड यांनी संबंधित तांत्रिक सहाय्यकास तत्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश देत खुलासा मागविला आहे. जिल्हा प्रशासन आता या प्रकरणात काय कठोर कारवाई करणार?. अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या विहिरीचा प्रश्न कसा सुटणार? हा जिल्हाभर चर्चेचा विषय बनला आहे.