हिंगोली: जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात आईने मुलाच्या खुनाची सुपारी दिले असल्याचे उघडकीस आले आहे. मुलगा अनैतिक संबंधात अडसर ठरत ही हत्या घडवून आणली असल्याचा प्रकार पोलीस तपासात समोर आला आहे. सचिन रामकिशन राजगुरू असे मृत युवकाचे नाव आहे.
या घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, सेनगाव तालुक्यातील जामदया शिवारात ८ एप्रिल रोजी रक्तबंबाळ अवस्थेत एका युवकाचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी त्याचा फोटो समाज माध्यमांवर प्रसारित केले. तो बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील वढव येथील असल्याचे नंतर कळाले सचिन रामकिशन राजगुरू याचा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. हा खून कोणी केला असावा याचा शोध सुरू करण्यात आला.
या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपासाला वेग दिला. अपर पोलीसअधीक्षक कमलेश मीना, उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने तपास सुरू केला. तपासा दरम्यान पोलिसांना समजले की मृत सचिन हिची आई लीलाबाई हिचे रामदास तनपुरे या व्यक्ती बरोबर अनैतिक संबंध होते. या संबंधात सचिन अडसर ठरत असल्याने त्याला संपवण्याचा कट रचण्यात आला. लीलाबाईच्या सांगण्यावरून रामदास तनपुरे याने नरेश पवार यास २५ हजार रुपयांची सुपारी दिली.
८ एप्रिल रोजी “पाहुण्यांकडे जायचे आहे” असे सांगून सचिनला दोघांनी सोबत घेतले. साखरा येथे त्याला दारु पाजण्यात आली. मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत जामदया शिवारात नेऊन त्याच्या डोक्यात दगड घालून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्ररणाचा तपास सुरू आहे. अवघ्या ४८ तासांत गुन्ह्याचा उलगडा केल्याबद्दल संबंधित पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना बक्षीस जाहीर करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.
आईनेच मुलाच्या खुनाच्या हत्येची सुपारी दिल्याचा पोलिसांचा दावा आहे. दरम्यान या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली असली तरी त्यांची नावे पोलिसांनी सांगितली नाहीत. या प्रकरणात अजून तपास सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, तपासात आईनेच हत्येचा कट रचला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
