राहाता : जागतिक महिला दिनानिमित्त भारतीय रेल्वेने महिलांचा सन्मान करण्यासाठी आज, शनिवारी ‘वंदे भारत’ रेल्वेचे सारथ्य महिलांच्या ताब्यात दिले. लोको पायलटपासून, रेल्वे व्तवस्थापक, स्थानक प्रबंधक, तिकीट निरीक्षकासह स्वच्छता कर्मचारीपर्यंत सर्वच जबाबदाऱ्या  महिलांवर सोपवल्या होत्या.

आज, शनिवारी सकाळी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून निघालेल्या वंदे भारत रेल्वेचे सारथ्य वरिष्ठ व अनुभवी महिला लोको पायलट सुरेखा यादव यांच्याकडे होते. त्यांच्यासमवेत सर्व महिला कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत करण्यात आले. प्रवासादरम्यान ठिकठिकाणी रेल्वे स्थानकांवर जल्लोषात स्वागत करण्यात आले. या रेल्वेचे साईनगर (शिर्डी) रेल्वे स्थानकावर आगमन होताच त्यांचे हार, पुष्पगुच्छ देत स्वागत झाले. फटाक्यांची आतषबाजी साईनगर रेल्वे स्थानकावर गुलाबांच्या फुलांची सजावट, केक कापून महिला दिन जोरदार साजरा करण्यात आला.

यामुळे वंदे भारत रेल्वेच्या महिला कर्मचारी भारावून गेल्या. आपल्या भावना व्यक्त करतांना त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन झालेल्या ऐतिहासिक रेल्वेचे सारथ्य करण्याचा आणि साईबाबांच्या पावनभूमीत ही रेल्वे घेऊन येण्याचा मान मिळाला, हा क्षण आयुष्यातील अविस्मरणीय आहे. महिला असल्याचा अभिमान वाटतो. साईनगरमध्ये स्थानक प्रबंधक व कर्मचाऱ्यांनी या रणरागिणींचे जोरदार स्वागत केले. स्थानक प्रबंधकांनी इलेक्ट्रिक वाहन चालवत त्यांना कार्यालयापर्यंत घेऊन जात, त्यांच्या कार्याचा सन्मान केला.

मध्य रेल्वेसाठी ऐतिहासिक क्षण

मध्य रेल्वेनं समाजमाध्यमावर या क्षणाला ‘ऐतिहासिक क्षण’ म्हटले आहे. भारतीय रेल्वेमधील महिलांची ताकद, समर्पण आणि नेतृत्वाचा उत्सव जागतिक महिला दिनानिमित्त साजरा करत आहे. प्रथमच वंदे भारत रेल्वे पूर्णपणं महिला कर्मचाऱ्यांनी चालवली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस मुंबई – साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस आज लोको पायलट, असिस्टंट लोको पायलट, ट्रेन मॅनेजर, तिकीट एक्झामिनर, ऑन-बोर्ड केटरिंग स्टाफ या सर्व महिला कर्मचाऱ्यांसह ट्रेन रवाना झाली. भारतीय रेल्वेमधील महिलांच्या ताकद, समर्पण आणि नेतृत्वाचा गौरव करणारा हा एक अभिमानास्पद क्षण आहे! असे मध्य रेल्वेनं म्हटले आहे.