ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन

देशमुख यांच्या निधनाने जुन्या पिढीतील एक राजकीय नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

सोलापूर : देशात सर्वाधिक वेळा विधानसभेवर निवडून येण्याचा उच्चांक नोंदविणारे शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव अण्णासाहेब देशमुख यांचे सोलापुरातील खासगी रुग्णालयात  शुक्रवारी रात्री निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते.  देशमुख यांना काही दिवसांपूर्वी पित्ताशयाच्या आजारामुळे  रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  त्यांना कृत्रिम जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले होते.

देशमुख यांच्या निधनाने जुन्या पिढीतील एक राजकीय नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. देशमुख हे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला या एकाच मतदारसंघातून आणि एकाच पक्षाकडून सर्वाधिक अकरावेळा निवडून आले. एकाच मतदारसंघातून सर्वाधिक वेळा विधानसभेवर निवडून येण्याचा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे दिवंगत नेते एम. करुणानिधी यांचा विक्रम त्यांनी मोडला होता.

मोहोळ तालुक्यातील पेनूर येथे १० ऑगस्ट १९२६ रोजी शेतकरी कुटुंबात जन्म झालेले देशमुख हे वकिली व्यवसायामुळे सांगोला येथे स्थायिक झाले. त्यावेळी सुरू झालेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी झोकून दिले. १९६२ साली देशभरात काँग्रेसचे वर्चस्व असतानाही सांगोला विधानसभा निवडणुकीत शेकापकडून देशमुख उभे राहिले आणि वयाच्या ३४ व्या वर्षी ते पहिल्यांदा आमदार झाले. १९७२ साली त्यांना पराभव पत्करावा लागला. तत्कालीन आमदार काकासाहेब साळुंखे यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक झाली. त्यात गणपतराव देशमुख निवडून आले. नंतर १९९५ सालचा अपवाद वगळता ते २०१९ पर्यंत म्हणजे तब्बल ५२ वर्षे आमदार राहिले. आमदारकीचा बहुतांशी काळ ते विधिमंडळात विरोधी बाकावर बसले. १९७८ साली शरद पवार यांच्या पुलोद सरकारमध्ये आणि नंतर १९९९ साली शेकापने काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला तेव्हा देशमुख यांनी मंत्रिपद सांभाळले.  २०१९ साली वृध्दापकाळामुळे त्यांनी राजकारणातून निवृत्ती पत्करली. त्यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख हे त्यांचे राजकीय वारसदार झाले. परंतु विधानसभा निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला.

चार पिढ्यांतील मतदारांशी नाळ जोडणारे गणपतराव देशमुख हे साधी राहणी, स्वच्छ  प्रतिमा, वैचारिक ध्येयनिष्ठा यासाठी ओळखले जात. विधिमंडळात अनेक विधेयकांवर त्यांनी केलेली अभ्यासपूर्ण भाषणे आजही संस्मरणीय ठरतात. मनोहर जोशी व नारायण राणे यांचा अपवाद वगळता यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत जवळपास सर्व मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ त्यांनी प्रत्यक्ष पाहिला आणि अनुभवला.

मुख्यमंत्र्यांकडून शोक

‘‘राजकारणातील एक साधे आणि सात्विक व्यक्तिमत्व हरपले, ’’ या शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गणपतराव देशमुख यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. सर्वाधिक काळ आणि सातत्याने त्यांनी राज्य विधिमंडळाचे प्रतिनिधीत्व के ले  हे त्यांच्या राजकीय कारकीर्दीचे वैशिष्ट होते, असेही ठाकरे यांनी म्हटले आहे.

सूतगिरण्यांची उभारणी

३५ वर्षांपूर्वी त्यांनी सांगोला शेतकरी सहकारी सूतगिरणी उभारली आणि संपूर्ण आशिया खंडात अग्रेसर बनविली. त्यापाठोपाठ महिला शेतकऱ्यांना एकत्र करून त्यांनी महिलांची स्वतंत्र सूतगिरणी उभारली. दोन्ही सूतगिरण्या सध्याच्या प्रतिकूल काळातही तग धरून आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Senior leader ganapatrao deshmukh passes away akp