सोलापूरमध्ये मोहितेंच्या ताकदीवर भाजपचे बळ वाढले

माळशिरससह अन्य तीन नगरपंचायती भाजपकडे आल्या असताना दुसरीकडे माढा नगरपंचायत काँग्रेसकडे कायम राहिली.

|| एजाज हुसेन मुजावर

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या माळशिरस तालुक्यात माळशिरससह नातेपुते व महाळुंग-श्रीपूर या तिन्ही नगरपंचायतीत भाजपने विजय संपादन केला. एका नगरपंचायतीत मोहिते-पाटील यांना विश्वासात न घेता पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याचा अट्टहास आणि परस्पर उभे केलेले उमेदवार हे सारेच अंगलट आले. यात अपेक्षेप्रमाणे मोहिते-पाटीलप्रणीत स्थानिक आघाडय़ांनीच बाजी मारली. अशा रीतीने तालुक्यात भाजपने वर्चस्व प्रस्थापित केले.

माळशिरससह अन्य तीन नगरपंचायती भाजपकडे आल्या असताना दुसरीकडे माढा नगरपंचायत काँग्रेसकडे कायम राहिली. तर बार्शी तालुक्यातील वैराग नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधकांच्या तुलनेत पुरेशी ताकद नसतानाही सत्ता खेचून आणली. यानिमित्ताने राष्ट्रवादीत निरंजन भूमकर यांचे राजकीय वजन नक्कीच वाढल्याचे दिसून येते.

या पाच नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये एकूण ८५ जागांपैकी सर्वाधिक ४२ जागा भाजपने जिंकल्या. राष्ट्रवादीला २३ जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसच्या वाटय़ाला १३ जागा आल्या. शिवसेनेला जेमतेम दोन जागा मिळाल्या.

वैरागमध्ये भाजपपुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत आणि सध्या शिवसेनेत असलेले माजी मंत्री दिलीप सोपल या दोघा मातब्बरांना मतदारांनी झिडकारत राष्ट्रवादीचे निरंजन भूमकर यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शविला आहे. माढय़ात काँग्रेसचे माजी आमदार धनाजी साठे यांनी वैयक्तिक ताकदीच्या जोरावर सत्ता राखताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ आमदार बबनराव शिंदे आणि शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत आणि त्यांचे बंधू शिवाजी सावंत यांचे आव्हान यशस्वीरीत्या परतवून लावले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Senior leader vijay singh mohite patil in solapur district nagar panchayat bjp bjp established dominance akp

Next Story
पवन यादव ठरला महाराष्ट्रातील पहिला ट्रान्सजेंडर वकील; जाणून घ्या कसा होता प्रवास
फोटो गॅलरी