साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे यांचे निधन

अनेक राजकीय स्थित्यंतरातही सलग सहा वेळा जिल्हापरिषद सदस्यपदी निवडून आले होते.

साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब भिलारे यांचे (वय ७२) यांचे हृदयविकाराने निधन झाले आहे. त्यांच्यावर भिलार येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील,डी एम बावळेकर, नितीन पाटील, राजूशेठ राजपुरे, विराज शिंदे आदी उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

महाबळेश्वर तालुक्यात एम आर भिलारे यांच्या प्रेरणेने बाळासाहेब भिलारे समाजकारणात व राजकारणात सक्रिय झाले. राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते ते तालुकाध्यक्ष असे पक्षसंघटनेत झोकून देऊन काम केल्याने १९९२ मध्ये जिल्हा परिषदेवर पहिल्यांदा निवडून गेले. यानंतर अनेक राजकीय स्थित्यंतरातही सलग सहा वेळा जिल्हापरिषद सदस्यपदी निवडून आले. डोंगराळ व दुर्गम महाबळेश्वर तालुक्याचे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले. महाबळेश्वरला पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या. कृषी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगार निर्मिती केली. जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी पतपुरवठा वाढवून शेतकऱ्यांना दिलासा दिला. भिलार व महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॉबेरी उद्योगाला राजमान्यता मिळवून दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली – अजित पवार

बाळासाहेब भिलारे यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुःख व्यक्त केले आहे. ”बाळासाहेब भिलारे यांच्या निधनाने सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारा सुसंस्कृत नेता हरपला आहे. महाबळेश्वर-पांचगणीच्या विकासासह पर्यटनवाढीसाठी त्यांनी तळमळीने काम केले. त्यांच्या निधनाने सातारा जिल्ह्याने कर्तृत्ववान सुपुत्र गमावला आहे. राजकीय, सामाजिक चळवळीची, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे. मी बाळासाहेब भिलारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.” अशा शब्दात अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Senior ncp leader balasaheb bhilare passes away in satara msr