ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा आढाव (वय ९५) यांचे सोमवारी रात्री निधन झाले. हमाल, रिक्षाचालक आणि बांधकाम मजुरांचे संघटन करून त्यांच्या न्यायासाठी लढणारे श्रमिक चळवळीचे आधारस्तंभ ही त्यांची ओळख होती. त्यांच्यामागे पत्नी शीला आढाव, असीम आणि अंबर हे दोन मुलगे, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.
मागील दहा दिवसांपासून आढाव यांच्यावर सुरु होते उपचार
फुफ्फुसात बिघाड झाल्याने डॉ. बाबा आढाव यांच्यावर गेल्या दहा दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आले होते. मात्र, वयोमानामुळे त्यांची प्रकृती उपचारांना पुरेसा प्रतिसाद देत नव्हती. उपचारांदरम्यान सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. कामगार चळवळीचा बुलंद आवाज या घटनेनंतर शांत झाला. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केलं आहे.
शरद पवारांची प्रतिक्रिया काय?
आपल्या महाराष्ट्रात प्रागतिक ,कृतीशील विचार मांडून ते आचरणात आणणाऱ्या शिलेदारांची एक मोठी फळी आहे. भूमिका घेताना परिणामांची, प्रस्थापित व्यवस्थेच्या रोषाची तमा न बाळगणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये ज्येष्ठ समाजसेवक, पुरोगामी विचारांचे खंदे समर्थक डॉ. बाबा आढाव ह्यांचं नाव आवर्जून घ्यावं लागेल. आज जेव्हा त्यांच्या निधनाचं वृत्त समजलं तेव्हा त्यांचा संघर्षाचा आणि सामाजिक न्यायाच्या लढ्याचा सारा पट डोळ्यासमोरून गेला. ‘एकाकी मजदूर’ चळवळ, कामगारांच्या हक्कांसाठीची त्यांची अखंड झुंज, समतेवर आधारित समाजरचनेचा त्यांचा ठाम निर्धार अशा सर्व भूमिकांमधून ते सतत प्रस्थापित व्यवस्थेला आव्हान देत राहिले. आजच्या सामाजिक दृष्ट्या अस्थिर, विषमतेने, विद्वेषाने ग्रासलेल्या काळात बाबा आढाव ह्यांच्यासारख्या निडर, विचारांशी बांधिलकी ठेवून काम करणाऱ्या विभूतींची उणीव सदैव भासत राहील. बाबा आढाव ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व आढाव कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करतो.
सुप्रिया सुळेंची पोस्ट काय?
आदरणीय डॉ. बाबा आढाव यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आहे. बाबा, माझ्यासह अनेकांसाठी प्रेरणास्रोत होते. त्यांनी शिव-फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचा, सत्यशोधकी विचारांचा मार्ग अधिक प्रशस्त केला. या विचारांची शिदोरी बाबांनी आम्हा सर्वांच्या ओंजळीत भरभरुन टाकली. ते अखेरच्या क्षणापर्यंत अगदी आजारपणातही जनतेच्या हितासाठी विशेषतः हमाल, रिक्षाचालक, कामगार, कष्टकरी आणि वंचित समूहाच्या उत्थानासाठी कार्यरत होते. त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरुन संघर्ष करीत होते. या सर्वांसाठी बाबा आढाव हे मोठा आधार होते. त्यांच्या जाण्यामुळे आज सामाजिक चळवळींच्या अवकाशात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनाने देश एका वैचारीक, सत्वशील, व्रतस्थ आणि अखंड सेवाव्रती नेतृत्वाला मुकला. या कठीण प्रसंगात आम्ही सर्वजण आढाव कुटुंबियांसोबत आहोत. बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली. अशी पोस्ट सुप्रिया सुळेंनी केली आहे.
बाबा आढाव यांनी नागरी संघटनेच्या माध्यमातून भवानी पेठेतून नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर वंचितांसाठी काम करून बाबांनी झोपडपट्टीवासीयांचे विविध प्रश्न मार्गी लावले. खेड लोकसभेची निवडणूक लढविल्यानंतर मात्र सक्रिय राजकारणापासून दूर होऊन त्यांनी सामाजिक क्षेत्रात काम करण्यात जीवन व्यतीत केलं. त्यांच्या जाण्याने कामगार चळवळीची मोठी हानी झाली आहे.
