पायल झांबरेच्या मृत्यूमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. पायलच्या कुटुंबाने हुंडा, पैसे आणि सोनं यासाठी पायलचा छळ होत होता असा आरोप तिच्या माहेरच्या मंडळींनी केला आहे. तसंच पायलने मृत्यूपूर्वी भावाला काही झालं तर त्यासाठी जबाबदार सासू असेल असं म्हणत एक मेसेज केला होता. दुर्दैवाने तोच तिचा अखेरचा मेसेज ठरला. २९ वर्षांची पायल झांबरे आता या जगात नाही. आता तिच्या माहेरच्या लोकांनी या प्रकरणी झांबरे कुटुंबावर आरोप केले आहेत.

काय म्हटलं आहे पायलच्या माहेरच्या लोकांनी?

२०१९ ला पायलचं लग्न झालं होतं. त्यावेळी वाटलं की माणसं चांगली आहेत, आमच्या मुलीला सांभाळून घेतील. कारण लग्नाच्या दुसऱ्या दिवासपासूनच पायलच्या सासरच्या लोकांनी त्यांच्या मागण्या सुरू केल्या. आम्हाला चांदीची झाल दिली नाही, आमच्या पाहुण्यांसाठी हॉटेल बुक केलं नाही. दिवाळी आली, अधिक महिना आला की सोनं पाहिजे, भांडी पाहिजेत, आम्हाला अमुक पाहिजे, तमुक पाहिजे अशा मागण्या होत होत्या. आमची उठ-बस अशा पद्धतीनेच झाली पाहिजे असंही म्हणणं होतं. तुझे आई-बाप भिकारी आहेत म्हणत पायलला टॉर्चर करत होते. तुझा बाप तुला काय देतो? आमच्या जमिनीत वाटा मागण्याची तयारीही झांबरेंनी केली होती असा आरोप पायलच्या वडिलांनी केला. एबीपी माझाशी पायलच्या कुटुंबाने संवाद साधला त्यावेळी त्यांनी हा आरोप केला आहे.

पायलच्या भावाने काय आरोप केला आहे?

पायलचा भाऊ म्हणाला आम्ही लग्नामध्ये त्यांना २५ लाख रूपये रोख आणि ५० तोळे सोनं हुंडा दिला होता. ७० ते ८० लाख रूपये आम्हाला लग्नाचा खर्च आला होता. प्रत्येक वर्षी दिवाळी आली की १० तोळे सोनं द्या अशी मागणी होती. या दिवाळीत आम्ही त्यांना सांगितलं की दुष्काळ आहे आमचा विचार करा तर त्यांनी अशा भानगडी केल्या असंही पायलच्या भावाने सांगितलं.

पायलला मुलगी झाली तेव्हा झांबरेंनी तिला माहेरी पाठवून दिलं होतं

पायलला मुलगी झाली तेव्हा झांबरेंनी पायलला आमच्या घरी पाठवून दिलं. आम्हाला मुलगाच हवा अशी त्यांनी मागणी होती. २०२३ ला त्यांनी रुग्णालयातच भांडण केलं होतं. ते न्यायला तयार नव्हतो. आम्ही त्यांच्या हाता-पाया पडलो आणि विनंती केली तुम्ही असं करू नका ज्यानंतर ते पायलला घेऊन गेले. तसंच मागील काही दिवसांपासून प्रॉपर्टीमध्ये तुझा हक्क मागून घे म्हणून तिचा छळ केला जात होता. या छळाला कंटाळूनच पायलने आत्महत्या केली असं पायलच्या आईने म्हटलं आहे.