ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पुढाकारातून स्थापन केलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीतील (ANIS) वाद चव्हाट्यावर आला आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष एन. डी. पाटील यांच्या निधनानंतर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा मुलगा हमीद दाभोलकर आणि मुलगी मुक्ता दाभोलकर यांनी संघटनेचा ७ कोटी रुपयांचा निधी असलेला ट्रस्ट ताब्यात घेतल्याचा गंभीर आरोप अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांना केलाय. तसेच हमीद-मुक्ता गटातील ५-१० लोक संघटनेच्या कोणत्याही पदावर नसल्याचंही पाटील यांनी म्हटलं आहे. आम्ही एन. डी. पाटील यांच्या निधनाच्या दुःखातून सावरत होतो त्यामुळे नव्या अध्यक्षांच्या निवडीचा संबंध नाही, असंही त्यांनी नमूद केलं. त्यांनी एक प्रसिद्धी पत्रक जारी करत आपली भूमिका मांडली आहे.

अविनाश पाटील म्हणाले, “एन. डी. पाटील हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष होते. त्यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यानंतरच्या दुःखातून आम्ही कार्यकर्ते, पदाधिकारी आणि संघटना अजून सावरत होतो. असं असताना आमच्या संघटनेने रिक्त झालेल्या अध्यक्ष पदाच्या जागेवर नवीन अध्यक्ष निवडीचा प्रश्न येत नाही. असा कोणताही निर्णय आम्ही घेतलेला नाही. येत्या जून २०२२ मध्ये विद्यमान राज्य कार्यकारिणीचा कालावधी संपत आहे. त्यानंतर संघटनेच्या नवीन अध्यक्षांची निवड केली जाईल. सरोज पाटील यांची अध्यक्ष म्हणून निवड हमीद- मुक्ता दाभोलकर स्थापित गटाने केली आहे. या निवडीबद्दल सरोज पाटील यांचे मी अभिनंदन करतो.”

Jayant Patil on Ajit Pawar comparision to Modi- Shah
‘तुलना कुणाशी करायची, याचं भान…’, अजित पवारांच्या ‘त्या’ दाव्यानंतर जयंत पाटील यांचा टोला
Baramati Namo MahaRojgar Melava
बारामतीमधील शासकीय कार्यक्रमासाठी शरद पवारांना पहिल्यांदा डावललं; सुप्रिया सुळे म्हणाल्या…
sanjay raut narendra modi (3)
“केंद्राने मोदींबरोबर असहकाराची भूमिका घेतल्यावर शरद पवारांनीच…”, राऊतांकडून पंतप्रधानांच्या जुन्या वक्तव्यांची उजळणी
Social workers detained yavatmal
आंदोलनाची दहशत… मोदींच्या सभेपूर्वीच सामाजिक कार्यकर्ते स्थानबद्ध

“हमीद-मुक्ता गटाचे ५-१० लोक समितीच्या कोणत्याही पदावर नाहीत”

“हमीद-मुक्ता गटाचा डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या पुढाकाराने स्थापन केलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी काहीही संबंध नाही. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती संघटना जे काम करते आहे, त्या कामाचे गपचूप श्रेय घेण्याचा प्रयत्न करणे ही या गटाची कार्य पद्धती आहे. या गटात असणारे ५-१० लोक समितीच्या कोणत्याही पदावर नाहीत, पण ते ४ ते ६ महिन्यांतून एखादा कार्यक्रम समितीच्या नावाने घेऊन समिती विरोधात समांतर कार्यपद्धती अवलंबत आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे नुकतीच सरोज पाटील यांची महाराष्ट्र अंनिसच्या अध्यक्षा म्हणून या गटाने निवड जाहीर करणे आहे,” असं अविनाश पाटील म्हटले.

“समितीच्या कामाशी संबंध नसताना अध्यक्षांची निवड जाहीर करणे खोडसाळपणा”

अविनाश पाटील म्हणाले, “समितीच्या कामाशी संबंध नसताना अशी निवड जाहीर करण्याचा हा खोडसाळपणा म्हणजे सार्वजनिक जीवनात संभम निर्माण करुन फसवणूक करणे आहे. नागरिक, प्रसार माध्यमे आणि समविचारी संस्था, संघटना, कार्यकर्ते यांची ही दिशाभूल आहे. वारसा हक्क आणि घराणेशाहीने एकूणच पुरोगामी चळवळीचे अतोनात नुकसान झाले आहे. संत, समाज सुधारकांची जाज्वल्य परंपरा असलेला महाराष्ट्र फुले-शाहू-आंबेडकरांचा विचार वारसा घेऊन आपला हिरक महोत्सव साजरा करीत आहे. अशा पुरोगामी महाराष्ट्राच्या ६० वर्षातील सर्वांगिण विकासाच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असणाऱ्या परिवर्तनशील चळवळींनी आपल्या मर्यादा ओलांडण्याचा देखील विचार करायला हवा.”

“दाभोलकर हयात असताना माझी समितीच्या कार्यध्यक्षपदी निवड”

“महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती संघटनेची स्थापना शहीद डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या पुढाकाराने ९ ऑगस्ट १९८९ रोजी झाली. १९८९ ते २००९ पर्यंत डॉ नरेंद्र दाभोलकर हे समितीचे कार्याध्यक्ष होते. ते हयात असताना २०१० साली अविनाश पाटील म्हणजे माझी कार्याध्यक्ष म्हणून‌ सर्वानुमते निवड करण्यात आली होती. त्यानंतर सलग जवळपास एक तप, १२ वर्षे मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्याध्यक्ष म्हणून काम पाहत आलो आहे. १९८९ पासून ते‌ मृत्यूपर्यंतच्या १७ जानेवारी २०२२ पर्यंत एन. डी. पाटील हेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अध्यक्ष होते,” अशी माहिती अविनाश पाटील यांनी दिली.

“दाभोलकरांच्या खुनानंतर समितीचं काम दुप्पट वाढलं”

अविनाश पाटील म्हणाले, “एका बाजूला डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या निर्घृण खुनाची वेदना मनात असताना, दुसऱ्या बाजूला कार्यकर्ते उमेदीने काम करत होते. खुनानंतरच्या ८ वर्षात लोकशाही, विकेंद्रित कार्य पद्धती आणि सामूहिक निर्णय प्रक्रियेमुळे समितीचे काम दुप्पट वाढले, व्यापक अंगाने विस्तारले‌ आहे. अंधश्रद्धा निर्मूलन‌ एके‌ अंधश्रद्धा निर्मूलन‌ या मर्यादेत न राहता समाजातील व्यापक परिवर्तनाशी जोडून घेण्याचा प्रयत्न आम्ही यथाशक्ती केला आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संघटीत कामाची‌ दखल राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली आहे.”

“हमीद-मुक्ता गट घराणेशाही आणि वारसा हक्क जोपासणारा”

“महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची ३० वर्षांच्या संघटनात्मक कार्य‌ पद्धतीतून पुढे आलेली लोकशाही, विकेंद्रितता आणि सामूहिक निर्णय प्रकिया अनेकदा संवाद करून देखील हमीद- मुक्ता गटाला मान्य झालेली नाही. त्यामुळे घराणेशाही आणि वारसा हक्क जोपासणारा हा गट समितीपासून स्वतंत्र झाला आहे. या गटाने संघटनेने सलग जवळपास ३० वर्षे चालविलेले समितीचे मुखपत्र राहीलेले अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र हे मासिक ताब्यात घेतले. त्यानंतर संघटनेने ‘अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका’ नावाचे नवे मुखपत्र सुरू केले. आतापर्यंत या पत्रिकेचे ५ हजारांहून अधिक वाचक सभासद झाले आहेत,” असं अविनाश पाटील यांनी सांगितलं.

“भावनिक आवाहन करून शैला दाभोलकरांकडे कार्याध्यक्षपद सुपुर्द”

ते म्हणाले, “महाराष्ट्र अंनिसच्या आर्थिक व्यवहारांसाठी १९९३ साली अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र नावाने सातारा येथे विश्वस्त संस्था स्थापन केली गेली होती. प्रतापराव पवार हे ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष आहेत. शहीद डॉ नरेंद्र दाभोलकर हे संस्थापक कार्याध्यक्ष होते, त्याच कार्याध्यक्ष पदावर डॉक्टरांच्या खुनानंतर लगेच आठवड्यात भावनिक आवाहनाने त्यांच्या पत्नी, डॉ शैला दाभोलकर यांच्याकडे‌ सुपुर्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.”

“हमीद-मुक्ता गटाने ७ कोटी रुपये असलेला संघटनेचा ट्रस्ट आपल्या ताब्यात घेतला”

“संघटनेतील सर्व कार्यकर्त्यांनी सतत २५ वर्षे देणग्या व जाहिरातींच्या माध्यमातून अत्यंत चिकाटीने, कष्टाने मिळवलेली आणि काटकसर करून वाढविलेली साधारण ७ कोटी रक्कम करून अंधश्रद्धा निर्मूलन समिती विश्वस्त संस्थांमध्ये जमा आहे. शहीद डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र विश्वस्त संस्था हमीद- मुक्ता दाभोलकर कुटुंबियांच्या प्रभावामुळे संघटनेच्या विरोधात गेली आहे आणि हमीद मुक्ता गटाने ७ कोटी रुपये असलेला संघटनेचा ट्रस्ट आपल्या ताब्यात घेतला आहे. त्या दरम्यान महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती संघटनेने आर्थिक व्यवहारांसाठी विवेक जागर संस्था गठित करुन आपले कामकाज नियमितपणे सुरू ठेवले आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.

“महाराष्ट्र अंनिस संघटनेची राज्य कार्यकारणी दर ३ वर्षांनी निवडली जाते”

अविनाश पाटील म्हणाले, “महाराष्ट्र अंनिसच्या राज्य कार्यकारणीत अध्यक्ष, उपाध्यक्ष ही सन्मानाची पदे असून कार्याध्यक्ष, प्रधान सचिव, सरचिटणीस, विविध सतरा विभागांचे कार्यवाह, सहकार्यवाह ही कार्यकारी आणि दैनंदिन कामाची जबाबदारी असलेली पदे आहेत. महाराष्ट्र अंनिस संघटनेची राज्य कार्यकारणी दर ३ वर्षांनी निवडली जाते. सध्याची २०१९ ते २०२२ या कालावधीसाठी राज्य पदाधिकाऱ्यांची राज्य कार्यकारणी भोर, जिल्हा पुणे येथे जून २०१९ मध्ये निवडली गेली होती. सदर राज्य कार्यकारणी निवड एन डी पाटील यांच्या मार्गदर्शनात केलेली आहे. समितीचे संस्थापक अध्यक्ष असलेल्या एन डी पाटील यांची याही वेळी पुन्हा अध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली होती. माझीही राज्य कार्याध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड झाली.”

“सोबतच डॉ प्रदीप पाटकर (पनवेल), उत्तम कांबळे (नाशिक), महादेवराव भुईभार (अकोला), श्यामराव अण्णा पाटील (इस्लामपूर), डॉ सुरेश खुरसाळे (अंबेजोगाई) यांची राज्य उपाध्यक्ष म्हणून निवड केली गेली. त्याच वेळी माधव बावगे (लातूर), सुशीला मुंडे (नवी मुंबई), संजय बनसोडे (इस्लामपूर), गजेंद्र सुरकार (वर्धा), नंदकिशोर तळाशिलकर (मुंबई) हे राज्य प्रधान सचिव निवडले गेले होते. नितीन राऊत (अलीबाग), सुरेखा भापकर (डोबिंवली), शहाजी भोसले (औरंगाबाद), हरिदास तम्मेवार (लातूर), विनायक सावळे (शहादा), डॉ ठकसेन गोराणे (नाशिक), संजय शेंडे (नागपूर), बबन कानकिरड (अकोला), सुधाकर काशीद (मोहोळ), कृष्णात कोरे (कोल्हापूर) हे राज्य सरचिटणीस म्हणून निवडले गेले होते. तसेच राज्यस्तरीय १७ विविध विभागांचे ५२ राज्य कार्यवाह व राज्य सहकार्यवाह हे निवडले होते,” अशी माहिती पाटील यांनी दिली.

“राज्यापासून ते शाखांपर्यंत सुमारे १३०० मुख्य पदाधिकाऱ्यांची टीम संघटनेसोबत”

अविनाश पाटील म्हणाले, “निवडलेल्या एकूण ७५ पदाधिकऱ्यांपैकी ५६ जण आजही पदावर कार्यरत आहेत. राज्य कार्यकारणी प्रमाणेच ३६ जिल्ह्यांच्या जिल्हाशाखांची रचना आहे. या ३६ जिल्ह्यातील ३५० पेक्षा अधिक शाखांच्या कार्यकारणीची रचनाही राज्य- जिल्हा कार्यकारणी प्रमाणे आहे. ५६ राज्य पदाधिकारी, १०८ जिल्हा अध्यक्ष, कार्याध्यक्ष, प्रधान सचिव आणि १०५० हुन अधिक शाखा अध्यक्ष, कार्याध्यक्ष, सचिव आहेत. राज्यापासून ते शाखांपर्यंत सुमारे १३०० मुख्य पदाधिकाऱ्यांची टीम संघटनेसोबत आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यातील सक्रिय कार्यकर्तेमधील ९० टक्के कार्यकर्ते संघटनेसोबत आहेत. महाराष्ट्रातील अशा सक्रिय कार्यकर्त्यांची संख्या सुमारे १० हजारपेक्षा अधिक निश्चित आहे. एन. डी. पाटील संस्थापक अध्यक्ष असलेली, शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पुढाकाराने स्थापन झालेली आणि मी कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत‌ राहीलेली महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती संघटना सक्रीय आहे.”

“स्वतः काहीही काम न करता, काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करु नये”

“तसे तर‌ अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करण्यासाठी व्यापक प्रयत्न आणि संघटनांची गरज आहे. असे संघटनात्मक काम हमीद- मुक्ता गटाने नक्की करावे, त्यासाठी नवीन संघटना स्थापन करावी, पण आधीपासून कार्यरत असलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नाव वापरून समांतर कार्यपद्धती अवलंबून नये. प्रत्यक्षात स्वतः काहीही काम न करता, काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करुन, संघटीत कार्यकर्त्यांच्या कामाचे श्रेय घेऊ नये. संघटना म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते समर्पित भावनेने काम करीत आहेत. खरे तर समाज परिवर्तनाच्या चळवळीत कार्यकर्त्यांना देण्यासारखे फार काही नसते, त्यातल्या योगदानाचे श्रेय हेच एकमेव असते. त्यातून त्यांना ऊर्जा मिळते. असे संघटीत कार्यकर्त्यांच्या कामाचे ‘श्रेयस’ कोणत्याही प्रकारे हिरावले जाऊ शकत नाही,” असंही त्यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केलं.

“वैयक्तिक अकासा पोटी केलेले धादांत खोटे आरोप”

अविनाश पाटील यांच्या या आरोपांनंतर हमीद दाभोलकर आणि मुक्ता दाभोलकर यांनी यावर प्रतिक्रिया दिलीय. ते म्हणाले, “वैयक्तिक अकासाच्या पोटी केलेले हे धादांत खोटे आरोप आहेत. आम्ही अंनिस ट्रस्टचे विश्वस्त नाही. या ट्रस्टमधून आम्ही कधीही मानधन किंवा प्रवासखर्च देखील घेतलेला नाही. आम्ही अंनिस चळवळीतील सामान्य कार्यकर्ते आहोत आणि राहू. योग्य वेळी आम्ही आमची सविस्तर भूमिका मांडू.”