लोहखनिज खाण उद्योगातील दोन बडय़ा अधिकाऱ्यांची नक्षलवाद्यांनी हत्या केल्यामुळे नक्षल चळवळीचा प्रभाव असलेल्या भागात लोखंडाच्या खाणी सुरू करण्याच्या प्रयत्नातील उद्योग वर्तुळाला जबरदस्त हादरा बसला आहे. उद्योग उभारणीसाठी असामाजिक तत्त्वांशी हातमिळवणी करणे थेट जीवावर बेतू शकते हे या घटनेने दाखवून दिले आहे.
नक्षलवाद्यांचा गड असलेल्या अबुजमाड पहाडाच्या पायथ्याशी असलेल्या सूरजागड भागात भरपूर लोहखनिज उपलब्ध आहे. गडचिरोली जिल्हय़ातील एटापल्ली तालुक्यात येणाऱ्या व घनदाट जंगल असलेल्या या भागात गेल्या काही वर्षांपासून केंद्र सरकारने अनेक उद्योगांना उत्खननासाठी परवाने दिले आहेत. यात प्रामुख्याने लॉयड मेटल, गोपानी, सनफ्लॅग, विरांगणा, इस्पात व जिंदाल या उद्योगांचा समावेश आहे. यापैकी लॉयड मेटलचा परवाना सर्वात आधीचा आहे. सहा वर्षांपूर्वी या भागात खाण सुरू करण्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे स्वामित्व शुल्कापोटी ३७ कोटी रुपये जमा करणाऱ्या या उद्योगाने प्रत्यक्ष काम सुरू व्हावे म्हणून अनेकदा प्रयत्न केले. तीन वर्षांपूर्वी या उद्योगाचे अधिकारी काही मजुरांसोबत या पहाडावर काम करत असताना नक्षलवाद्यांनी त्यांचे अपहरण केले होते. नंतर दोन दिवसांनी त्यांची सुटका करण्यात आली. तेव्हा या सर्वाना बेदम मारहाण करण्यात आली होती. या घटनेमुळे काम पुन्हा ठप्प झाले होते.
वर्षांपूर्वी लॉयड मेटलने ओरिसात लोहखनिजाच्या खाणी असलेल्या हेमलता मिनरल्सचे संचालक मल्लिकार्जुन रेड्डी यांच्याशी संपर्क साधून त्यांना खाण उभारणीचे कंत्राट दिले. नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या क्षेत्रात काम करण्याचा त्यांना अनुभव आहे, या एकाच मुद्दय़ावर हा करार झाला. रेड्डी यांनासुद्धा वर्षभर काहीही करता आले नाही. अखेर लॉयडने गेली ३० वर्षे बल्लारपूर पेपर मिलमध्ये बांबू विभागाचे व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या जसपालसिंग धिल्लन यांची खाण विभागाचे उपाध्यक्ष म्हणून नेमणूक दिली. कागद निर्मितीसाठी याच जंगलातून बांबू काढणाऱ्या बल्लारपूर पेपर मिल व नक्षलवाद्यांमधील साटेलोटे सर्वाना ठाऊक आहेत. धिल्लन आजवर तेच काम करत असल्याने त्यांना लॉयडमध्ये आणण्यात आले. या दोघांनी नक्षलवाद्यांशी चर्चा करण्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून प्रयत्न सुरू केले होते. या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून असलेल्या पोलिसांनी लॉयड मेटलला याच काळात तीन पत्रे पाठवून, ‘नक्षलवाद्यांशी भेटण्याचा प्रयत्न अथवा आर्थिक देवाण घेवाण करू नका,’ असे निर्देश दिले होते. या भागात फिरताना पोलिसांना सूचना देऊन फिरावे असेही या पत्रात नमूद करण्यात आले होते. त्याकडे दुर्लक्ष करून या दोघांनी नक्षलवाद्यांच्या स्थानिक समर्थकांच्या माध्यमातून बोलणी सुरू केली होती. नेमकी हीच बाब या दोघांच्या जीवावर बेतल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
गेल्या महिन्यात याच भागात खाण सुरू करण्याचा प्रस्ताव देणाऱ्या जिंदाल उद्योग समूहातर्फे आलापल्लीला जनसुनावणी आयोजित करण्यात आली होती. या सुनावणीच्या निमित्ताने नक्षलवाद्यांनी शेकडो पत्रके काढून या भागात उत्खननाला विरोध केला होता. नक्षलवाद्यांच्या विरोधानंतरसुद्धा प्रशासनाने जिंदाल समूहाची जनसुनावणी घेतली होती. ही पाश्र्वभूमी लक्षात घेऊन नक्षलवाद्यांनी या दोन बडय़ा अधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलावून सापळय़ात अडकवले व नंतर ठार मारले, असा तर्क आता पोलिसांकडून सांगितला जात आहे.
या दोघांना ठार मारल्यामुळे आता या भागात खाण सुरू करण्याची हिंमत कुणी करणार नाही, हे डावपेचसुद्धा या मागे असू शकतात असे जाणकारांचे म्हणणे आहे. छत्तीसगढमध्ये बडय़ा राजकीय नेत्यांना ठार केल्यानंतर आता नक्षलवाद्यांनी उद्योग जगतातील बडय़ा अधिकाऱ्यांना लक्ष्य केल्याचे आज स्पष्ट झाले आहे.

असामाजिक तत्त्वांशी हातमिळवणी महाग पडू शकते..
लॉयड मेटलने नक्षलवाद्यांशी परस्पर चर्चा करण्याची जबाबदारी कुणावरही सोपवली नव्हती, असे स्पष्टीकरण गुरुवारी करून या संपूर्ण प्रकरणातून स्वत:ला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. यासंदर्भात गडचिरोलीचे पोलीस उपमहानिरीक्षक रवींद्र कदम यांच्याशी संपर्क साधला असता, असामाजिक तत्त्वांशी हातमिळवणी करणे किती महागात पडू शकते हेच आजच्या घटनेतून दिसून आले आहे. आता तरी उद्योगांनी यातून धडा घ्यावा, असे ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले.