रत्नागिरी : हातात पाठ्यपुस्तक, डोळ्यांसमोर दुर्बीण आणि आजूबाजूला निसर्ग… विज्ञान शिकण्याची ही पद्धत ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी केवळ नवा अनुभव नाही, तर कुतूहलाला दिशा देणारी संधी ठरत आहे. वर्गखोलीच्या चार भिंतींपलीकडे जाऊन पाहणे, प्रयोग करणे, प्रश्न विचारणे आणि स्वत: निष्कर्षापर्यंत पोहोचणे, या प्रक्रियेतून विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम चिपळूण येथील सेवासाधना प्रतिष्ठान गेल्या काही वर्षांपासून करत आहे.
चिपळूण तालुक्यातील केतकी गावातील ‘आरण्यक’ हे संस्थेच्या अनुभवाधारित शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र. नैसर्गिक वातावरणात विद्यार्थ्यांसाठी निवासी शैक्षणिक शिबिरे आयोजित केली जातात. २०१८ पासून येथे ३५ हून अधिक शिबिरे झाली आहेत. विज्ञान, पर्यावरण, निसर्ग आणि हस्तकला यांबरोबर योग, पक्षीनिरीक्षण, निसर्गभ्रमण, विज्ञान प्रयोग, गटचर्चा, तारांगण निरीक्षण आणि आरोग्यविषयक उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा प्रयत्न केला जातो.
सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीचे ‘स्वत:ला ओळखा’ हे दिवाळी शिबीर संस्थेच्या उपक्रमांतील वैशिष्ट्यपूर्ण प्रयोग आहे. ग्रामीण आणि वंचित शाळांतील विद्यार्थ्यांना प्राधान्य देत आत्मशिस्त, स्वावलंबन, चिकित्सक विचार, लैंगिक समानता आणि सांघिक भावना यांसारखी जीवनमूल्ये रुजविण्याचा प्रयत्न येथे केला जातो. विज्ञान विषयाची भीती दूर करून तो विद्यार्थ्यांच्या अनुभवाचा भाग बनविण्यासाठी मोबाइल सायन्स लॅबचा उपक्रम राबविण्यात येतो. पुण्यातील विज्ञानवाहिनीच्या सहकार्याने आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोगांची संधी दिली जाते. पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठीही अभ्यासक्रमाशी संबंधित प्रयोग, उपकरणे आणि प्रतिकृतींच्या माध्यमातून विज्ञान शिकविले जाते.
खडक-जीवाश्म प्रदर्शन, सूक्ष्मदर्शक, हवामान उपकरणे, सौर कुकर, पश्चिम घाटावरील माहितीपट तसेच महाराष्ट्र आणि वशिष्ठी नदी खोर्याचे थ्रीडी नकाशे यांमुळे अवघड संकल्पना विद्यार्थ्यांसाठी अधिक सुलभ होतात. संस्थेच्या खडक, जीवाश्म आणि खनिजांच्या संग्रहातून पृथ्वीचा इतिहास आणि जीवनाच्या उत्क्रांतीची ओळखही विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष नमुन्यांच्या माध्यमातून करून दिली जाते.
दिवसा विज्ञानाचे प्रयोग आणि रात्री आकाशातील तार्यांचा शोध, अशी अनुभवांची सांगड संस्थेच्या उपक्रमांत घातली जाते. १६ इंची वैज्ञानिक दुर्बिणीतून ग्रह-तारे आणि विविध खगोलीय वस्तू पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळते. रत्नागिरी जिल्ह्यातील विज्ञान शिक्षकांसाठीही विशेष तारकादर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
शिक्षणापुरते कार्य मर्यादित न ठेवता कौशल्य विकास आणि रोजगारनिर्मितीलाही सेवासाधनाने महत्त्व दिले आहे. केतकी गावातील तरुणांना नारळाच्या करवंटीपासून पर्यावरणपूरक वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या कौशल्याच्या आधारे काही तरुणांनी छोटे व्यवसाय सुरू केले असून स्थानिक पर्यटन बाजारपेठेतही त्यांना संधी मिळाली आहे.
‘शोधयात्रा ज्ञानाची’ या प्रकल्पातून ग्रामीण विद्यार्थ्यांना विज्ञान, भूगोल, जैवविविधता आणि पर्यावरणाचा प्रत्यक्ष अभ्यास करण्याची संधी देण्यात आली. खडक-जीवाश्म अभ्यास, ३डी नकाशे, पक्षीनिरीक्षण, सूक्ष्मदर्शक निरीक्षण, सौरऊर्जा, पर्यावरणीय कृती नियोजन आणि निवासी निसर्गशिबिर अशा विविध टप्प्यांतून विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यात आला.
शैक्षणिक उपक्रमांबरोबर सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीवही संस्थेने जपली आहे. करोना काळात तसेच २०२१ मधील चिपळूणच्या पूरस्थितीत मदतकार्य करण्यात आले. दुर्गम आदिवासी वस्त्यांमध्ये जीवनावश्यक वस्तू, शैक्षणिक साहित्य, गणवेश आणि महिलांसाठी आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्याची दखल घेत १९ एप्रिल २०२५ रोजी सेवासाधना प्रतिष्ठानला ‘अमर ऊर्जा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. ८० हून अधिक प्रवेशिकांमधून संस्थेची झालेली निवड तिच्या कार्याची दखल घेणारी ठरली.
विस्तारासाठी आर्थिक बळाची गरज
उपक्रमांचा विस्तार होत असताना साधनसामग्री आणि प्रशिक्षित मनुष्यबळाची गरजही वाढत आहे. दुर्गम शाळांपर्यंत विज्ञानप्रयोग, भूगोल साहित्य, खडक-जीवाश्म संग्रह आणि आकाशदर्शनाचे साहित्य पोहोचविण्यासाठी सध्या भाड्याच्या वाहनावर अवलंबून राहावे लागते. स्वत:चे वाहन, पूर्णवेळ प्रशिक्षक, ग्रामीण शाळांसाठी प्रयोगसाहित्य आणि अधिक ३डी शैक्षणिक मॉडेल्स उपलब्ध झाल्यास संस्थेच्या कामाची व्याप्ती वाढू शकते.
