सांगलीत उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या महिला अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शुक्रवारी पहाटे ही घटना घडली असून आरोपींनी पीडित महिला अधिकाऱ्यावर चाकू हल्ला देखील केला आहे. या हल्ल्यात त्या किरकोळ जखमी झाल्या आहेत.

पीडित महिला अधिकारी शुक्रवारी पहाटे जॉगिंगसाठी गेल्या असता हा प्राणघातक हल्ला झाला आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पीडित महिला अधिकारी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात भूसंपादन विभागात उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे त्या जॉगिंगसाठी विश्रामबागच्या नेमिनाथनगर येथील कल्पद्रुम क्रीडांगणावर गेल्या होत्या. जॉगिंग सुरू असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञातांनी त्यांची छेडछाड केली. तसेच हाताच्या दंडाला पकडत अपशब्द वापरले आहेत. या प्रकारानंतर हात लावणाऱ्या अज्ञाताला पीडितेनं लाथ मारून खाली पाडलं, या झटापटीत दुसऱ्या अज्ञात व्यक्तीनं पीडितेवर चाकूने हल्ला केला. यामुळे पीडित महिला अधिकाऱ्याच्या हातावर किरकोळ जखम झाली आहे.

हेही वाचा- सकाळी फिरण्यासाठी गेलेल्या वृद्धेचा कालव्यात पडून मृत्यू; बारामतीमधील निरा डाव्या कालव्यातील घटना

मार्शल आर्ट असणाऱ्या पीडितेनं स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रतिहल्ला केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. सदरच्या अज्ञातापैकी एकाने १७ मे रोजी पाठलाग करत छेडछाड करण्याचा प्रकार केला होता. मात्र त्यावेळी त्यांनी दुर्लक्ष केलं होतं. आज तीच व्यक्ती पहाटेच्या सुमारास पुन्हा आली होती असं पीडितानं तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. उपजिल्हाधिकारी महिला अधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेमुळे सांगलीत खळबळ उडाली आहे.