आगामी निवडणुकीची रणनीती आखताना भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बारामती मतदारसंघात ताकद लावण्यास सुरुवात केली आहे. भाजपाचे अनेक ज्येष्ठ नेते बारामतीत दौरा करत आहेत. यात राज्यातील मंत्र्यांबरोबरच केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर बारामतीत पवार कुटुंबाचा पराभव करणार असल्याचा दावा केला. यावर राष्ट्रवादी काँग्रसेचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी एकवेळ सूर्य पश्चिमेकडे उगवेल, पण बारामतीकर पवारांना सोडणार नाही, असं मत व्यक्त केलं. याबाबत विचारलं असता शिवसेनेच्या शिंदे गटातील बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते सांगलीत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहाजीबापू पाटील म्हणाले, “राजकारणात शरद पवार मोठेच नेते आहेत. वसंतदादा मुख्यमंत्री असताना बारामतीत शरद पवारांना निवडणूक जिंकणं अवघड गेलं होतं. तेव्हा शरद पवारांविरोधात शहाजी काकडे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाची घटना बनवत असताना प्रत्येक नागरिकाला एक मत देण्याचा अधिकार दिला आहे. या मतदारांनी या देशात फार चमत्कार केले आहेत.”

“डॉ. आंबेडकरांचाही पराभव झाला होता”

“इंदिरा गांधींचाही पराभव झाला आहे. अटलबिहार वाजपेयी, लालकृष्ण अडवाणीदेखील पराभूत झाले. स्वतः डॉ. आंबेडकरांचाही पराभव झाला होता. एवढी महान माणसं पराभूत झालेली आहेत. त्यामुळे निवडणुकीत कुणाचा विजय होणार हे कुणीही सांगू शकत नाही. तोच या निवडणुकांचा महिमा आहे,” असं मत शहाजीबापू पाटलांनी व्यक्त केलं.

“शिंदेंच्या नेतृत्वात स्वप्नातही नव्हती अशी राजकीय क्रांती झाली”

शहाजीबापू पाटील म्हणाले, “एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात स्वप्नातही नव्हती अशी राजकीय क्रांती झाली आहे. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आदित्य ठाकरे मुंबईतच होते. असं असताना मुंबईतून पटापट आमदार निघून गेले आणि त्यांनी एक क्रांती घडवून आणली.”

“आम्ही गुवाहटीत असताना या सर्वांनी महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न केला”

“या क्रांतीचा या सर्व लोकांना राग आला आहे. त्यामुळे आम्ही गुवाहटीत असताना या सर्वांनी महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न केला. आमदारांच्या घरासमोर बसणे, दगडं मारणे, घरं जाळणे, घरं फोडणे असे सर्व प्रकार झाले. संजय राऊतांची वक्तव्यं सर्वांनी ऐकली. एवढं करुन त्यालाही फार काही प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर आता ते नव्याने प्रयत्न करत आहेत. या टीका होतच असतात. ते आमच्यावर टीका करतील आणि आम्हीही त्यांच्यावर टीका करू,” असं मत शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : “शरद पवारांपासून उद्धव ठाकरेंपर्यंत सगळे मुंबईत होते, तरी…”, सत्तांतरावरून शहाजीबापूंचा मविआवर हल्लाबोल

“इथं आम्हाला पेटी बघायला मिळेना आणि…”

“राजकारणात सहन करत हळूहळू जनतेची कामं करायची असतात, सेवा करायची असते. साधुसंतांनी आणि मोठमोठ्या नेत्यांनी आपल्याला हेच शिकवलं आहे. त्यामुळे खोक्याची कल्पना ज्यांनी आयुष्यभर खोकी सांभाळली त्यांच्या डोक्यातून आली आहे. इथं आम्हाला पेटी बघायला मिळेना आणि विरोधक खोके दाखवत आहेत,” असं म्हणत शहाजीबापूंनी त्यांच्यावरील खोक्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahajibapu patil comment on jayant patil sharad pawar baramati constituency rno news pbs
First published on: 09-09-2022 at 10:14 IST