मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबदच्या दौऱ्यावर आहेत या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पैठण येथे जाहीर सभा झाली. या सभेला गर्दी व्हावी म्हणून लोकांना पैसे वाटण्यात आले, असा आरोप उद्धव ठाकरे गटातील नेते चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांनी केला आहे. त्यांच्या याच आरोपाला शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले आहे. त्यांनी खैरे आणि अंबादास दानवे यांना मैदानात या, असे थेट आव्हान दिले आहे. तसेच खैरे आणि दानवे यांना आजच्या सभेसाठीच्या स्टेजवर एका कोपऱ्यात दोन खुर्च्या द्यालया हव्या होत्या. मगच त्यांना संदीपान भुमरे आणि एकनाथ शिंदे यांची ताकद समजली असती, असा टोलाही शहाजीबापू पाटील यांनी लगावला.

हेही वाचा >>> एका मिनिटात १०० किलो पेढे गायब; मुख्यमंत्र्यांनी पाठ फिरवताच लाडू, पेढ्यांची पळवापळवी

संदीपान भुमरे यांनी आजच्या सभेसाठी मोठा मंच आणि मंडप उभा केला आहे. खूप साऱ्या खुर्च्या आहेत. या सभेसाठी मोठा जनसागर जमा झाला आहे. येथे पूर्ण मंत्रीमंडळ आलं आहे. मात्र भुमरे यांनी एक चूक केली. त्यांनी आणखी दोन खुर्च्या या स्टेजवर ठेवायला हव्या होत्या. या खुर्च्या मध्यभागी नव्हे तर एका कोपऱ्यात ठेवायला हव्या होत्या. यातील एक खुर्ची चंद्रकांत खैरे तर दुसरी खुर्ची अंबादास दानवे यांना द्यायला हवी होती. मगच त्या दोघांना भुमरे आणि एकनाथ शिंदे यांची ताकद समजली असती. असे शहाजीबापू पाटील म्हणाले. तसेच. हे सतत टीव्हीवर जातात. टीका करतात. त्यांनी मैदानात यावं, असे जाहीर आव्हान शहाजीबापू पाटील यांनी केले.

हेही वाचा >>> ‘…तर तुमच्याविरोधात तक्रार दाखल करायला सांगेन,’ पत्रकारांच्या प्रश्नाचे उत्तर देताना नारायण राणे भडकले; नेमकं काय घडलं?

चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांनी काय आरोप केला?

उद्धव ठाकरे गटातील नेते चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संदीपान भुमरे यांच्यावर गंभीर आरोप केला. आजची सभा यशस्वी व्हावी तेसच लोकांची गर्दी दिसावी म्हणून भुमरे यांनी लोकांना पैसे देऊन बोलावलं, असा दावा त्यांनी केला. याच दाव्यासंदर्भात एक कथित ऑडिओ क्लीपही व्हायरल झाली होती. तर दुसरीकडे संदीपान भुमरे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. त्यांनी ही ऑडिओ क्लीप विरोधकांनीच तयार केली आहे, असा आरोप केला.