scorecardresearch

‘महाराष्ट्रात कशाला जन्म घेतलात’ विचारणाऱ्या उद्धव ठाकरेंना शहाजीबापू पाटलांचं उत्तर; म्हणाले “रागीट आणि चिडखोर स्वभावामुळे….”

उद्धव ठाकरेंचं विधान माझ्या काळजाला लागलं, शहाजीबापू पाटील दुखावले

Shahajibapu Patil Uddhav Thackeray
उद्धव ठाकरेंचं विधान माझ्या काळजाला लागलं, शहाजीबापू पाटील दुखावले

बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत केलेल्या टीकेला उत्तर दिलं आहे. ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल’ या डायलॉगमुळे प्रसिद्ध झाल्या शहाजीबापू पाटील यांना उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या मातीत तुम्ही कसे काय जन्माला आलात? अशी विचारणा केली होती. उद्धव ठाकरेंचं हे विधान आपल्याला काळजाला लागलं असल्याचं शहाजीबापू पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे. आमच्या गावरान भाषेवर टीका करण्याचा तुम्हाला अधिकार नाही असंही त्यांनी सुनावलं आहे.

“संजय राऊतांचं शरीर, मन आणि बुद्धी कुचकं आहे. ते कधी जनतेसमोर गेलेच नाहीत. तेच आदित्य ठाकरेंना काय बोलायचं शिकवत असतात. पण दुर्दैवाने उद्धव ठाकरेंनीही तशा पद्धतीने बोलणं हा महाराष्ट्रातील ग्रामीण जनतेचा अपमान आहे,” असं शहाजीबापू पाटील म्हणाले आहेत.

“आमच्या गावरान भाषेवर टीका करण्याचा तुम्हाला अधिकार नाही. त्यांचं महाराष्ट्रात जन्माला का आलात हे विधान माझ्या काळजाला लागलं. महाराष्ट्राबद्दल मी काही बोललोच नव्हतो. आसाममधील निसर्ग सौदर्याचं कौतुक करणं काही चूक नाही. ही राष्ट्रीय एकात्मकता आहे. महाराष्ट्र आहे म्हणून राष्ट आहे, आणि राष्ट्र आहे म्हणून महाराष्ट्र आहे,” असं शहाजीबापूंनी सांगितलं.

Uddhav Thackeray Interview: “महाराष्ट्राच्या मातीत कसे काय जन्माला…”, ‘काय झाडी, काय डोंगार’ फेम शहाजीबापू पाटील यांच्यावर उद्धव ठाकरेंची टीका

“उद्धव ठाकरेंसारख्या व्यक्तीने कोणताही विचार न करता टीका केली. आज आसामवर टीका केली, उद्या काश्मीर, परवा राजस्थानवर कराल. रागीट आणि चिडखोर स्वभावामुळे नेमकं काय बोलायचं, सांगायचं याचं भान राहिलेलं नाही,” अशी टीका शहाजीबापूंनी केली.

“शिवसेनेचे प्रमुख तुम्ही होतात की शरद पवार होतात? तुम्ही मुख्यमंत्री झालात याचं दु:ख नाही, पण शिवसेनेच्या आमदारांना, नेत्यांना एकत्र घेऊन निर्णय घ्यायला हवा होता. तसं न केल्याने राष्ट्रवादी सतत आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री केल्याचं सांगत राहिले. सत्ता, विकास हा राष्ट्रवादीच्या मालकीचा झाला. आम्ही आमदार फक्त लेटरपॅड घेऊन फिरत होतो,” अशी खंत शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केली.

Uddhav Thackeray Interview: पाहा उद्धव ठाकरेंची संपूर्ण मुलाखत

“भाषणात बाळासाहेबांचं नाव घ्यायचं असेल, तर आम्ही परवानगी मागायला जाणार का? हा काय पोरखेळ सुरु आहे. संजय राऊत शिकवतात आणि हे सगळं बोलतात. तुम्ही शिवेसना स्थापनेच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा फाटो लावला होता. त्यासाठी साताऱ्याच्या, कोल्हापूरच्या राजेंना विचारलं होतं का? छत्रपतींप्रमाणे हिंदूह्रदयसम्राटदेखील सर्वांचे आहेत. सर्वांना नाव घेण्याचा अधिकार आहे. आमचा तर पक्षच बाळासाहेबांचा आहे. नाव घेणार, फोटो लावणार आणि प्रत्येक भाषणात जयजयकार करणार. कोणीही आम्हाला अडवू शकत नाही,” असं शहाजीबापू पाटील म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-07-2022 at 16:43 IST