scorecardresearch

शाहू महाराजांची ओळख सातासमुद्रापार पोहोचणार

द्रष्टे राजे आणि कर्तेसुधारक म्हणून राजर्षी शाहूमहाराजांची असलेली ओळख आता सातासमुद्रापार पोहोचणार आहे. ‘राजर्षी शाहू छत्रपती जीवन व कार्य’ हा त्यांचा चरित्रग्रंथ इंग्रजी, जर्मन, जपान, फ्रेंच व रशियन या पाच परकीय भाषांमध्ये अनुवादित होऊन पोहोचणार आहे.

द्रष्टे राजे आणि कर्तेसुधारक म्हणून राजर्षी शाहूमहाराजांची असलेली ओळख आता सातासमुद्रापार पोहोचणार आहे. ‘राजर्षी शाहू छत्रपती जीवन व कार्य’ हा त्यांचा चरित्रग्रंथ इंग्रजी, जर्मन, जपान, फ्रेंच व रशियन या पाच परकीय भाषांमध्ये अनुवादित होऊन पोहोचणार आहे. तर देशातील १४ प्रादेशिक भाषांमध्ये ‘राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ’ हा विस्तृत ग्रंथ पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू असून कन्नड, गुजरातनंतर लवकरच सिंधी, उर्दू व तेलुगू भाषेत प्रकाशित होणार आहे. एकंदरित १४ प्रादेशिक भाषांमध्ये चरित्रग्रंथ प्रकाशित करण्याचा मानस आहे.
महाराष्ट्र सुवर्णवर्ष सोहळय़ांतर्गत राजर्षी शाहू छत्रपती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याअंतर्गत शाहू छत्रपतींचे प्रासादिक शैलीतील चरित्र प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला होता. चरित्रलेखनाची ही कामगिरी शाहू चरित्रकार व अभ्यासक म्हणून डॉ. जयसिंगराव पवार यांच्यावर सोपविण्याचे एकमताने ठरले होते. मराठीबरोबर हिंदी व इंग्रजी भाषेतही ग्रंथ प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार डॉ. पवार यांनी लिहिलेल्या ‘राजर्षी शाहू छत्रपती जीवन व कार्य’ या चरित्रग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.     
सुमारे ९०० पानांचा असलेला हा ग्रंथ तीन खंडांमध्ये विभागलेला आहे. त्याची मराठीची पहिली आवृत्ती २००१ साली प्रकाशित झाली. तर दुसरी आवृत्ती २००७ मध्ये बाजारात आली होती. या ग्रंथाला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. २०१० साली धारवाड येथे कन्नड आवृत्तीचे प्रकाशन झाले. तर गतवर्षी जानेवारी महिन्यात कोकणी भाषेतील आवृत्ती प्रकाशित झाली. हिंदी व इंग्रजी या भाषेतील तद्वतच सिंधी, गुजराती व उर्दू या प्रादेशिक भाषांतील अनुवाद तयार झाला आहे. शासनाच्या अनुदानातून या ग्रंथाचे प्रकाशन नजीकच्या काळात होणार आहे.     
शाहूमहाराजांचे चरित्र विदेशी भाषांमध्येही प्रकाशित करण्याचा निर्णय झाला आहे. राजर्षी शाहू छत्रपती जीवन व कार्य या नावाचा सुमारे २०० पानांचा चरित्रग्रंथ इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, जपानी व रशियन या पाच परकीय भाषांमध्ये प्रकाशित होणार आहे. यापैकी जर्मन भाषेतील ग्रंथाच्या अनुवादाचे काम स्वित्र्झलड येथे पन्नास वर्षे वास्तव्यास असणारे सुधीर पेडणेकर यांनी पूर्ण केले आहे. तेथील एका विद्यापीठाने ग्रंथप्रकाशनाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्याद्वारे संपूर्ण जर्मनीत हा ग्रंथ पोहोचविण्याच्या हालचाली सुरू आहेत. तर रशियन भाषेतील ग्रंथाचा अनुवाद येथील डॉ. मेघा पानसरे यांनी केला आहे.
फ्रेंच व जपानी भाषेतील अनुवादाच्या कामालाही हात घातला गेला आहे. याद्वारे राजर्षी शाहूमहाराजांचे जीवनकार्य जगभर पोहोचविले जाणार आहे. संस्थानिकांच्या वैभवात आणि विलासी जीवनामध्ये रममाण न होता शाहूमहाराजांनी सामाजिकदृष्टय़ा जी क्रांतिकारक पावले टाकली आणि सामाजिक सुधारणा घडवून आणल्या त्याचा अक्षरठेवा या निमित्ताने देश-विदेशात पोहोचणार आहे.

निधीची आवश्यकता
राज्य शासनाने हिंदी, इंग्रजी, कोकणी, सिंधी व गुजराथी या भाषांत राजर्षी शाहूंचा ग्रंथ पोहोचविण्यासाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक भाषेसाठी सुमारे सव्वापाच लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे. त्यापैकी निम्मे अर्थसाहाय्य प्राप्त झालेले आहे, तर उर्वरित निधी अद्याप मिळावयाचा आहे. तो हाती पोहोचणार नाही, तोपर्यंत हे काम रखडण्याची चिन्हे आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shahu maharaj life and work book translated in five foreign languages

ताज्या बातम्या