संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवरुन सुरु असलेल्या गोंधळावरुन श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी भाष्य केले आहे. संभाजीराजेंना पाठिंबा देण्यावरुन मुख्यमंत्र्यांनी युटर्न घेतला नाही, अशी प्रतिक्रिया श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी दिली आहे. शिवसेना आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यात झालेला ड्राफ्ट हा कच्चा होता असेही शाहू महाराज म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एबीपी माझाच्या वृत्तानुसार, “त्यांची व्यक्तिगतरित्या उमेदवारी नाकारली आहे. आमच्यात काही विचारविनिमय झाला असता किंवा मी त्यांना संमती दिली असती किंवा नसती. काही झालं असतं. पण तसा काही विचारविनिमय झाला नसल्यामुळे घराण्याचा अपमान झाल्याचा काही प्रश्न येत नाही. हे राजकारण आहे. माझ्यापर्यंत आले असते तर वेगळा विषय असता. पण तसं काही झालं नाही,” असे श्रीमंत शाहू महाराज म्हणाले.

“राज्यसभेवर जाण्याचे जानेवारीपासून त्यांचे प्रयत्न सुरु झाले होते. त्यांची काय योजना होती याची कल्पना काही नव्हती. त्यावेळी देखील चर्चा नाही झाली. पण तिकडे जात असल्याचा निर्णय त्यांनी मला सांगितला. त्याला मी विरोध केला होता पण लोकशाही असल्याने ते कुठेही जाऊ शकतात,” असेही शाहू महाराज म्हणाले.

“आतापर्यंत छत्रपती घराण्याचा निर्णय आहे असं वेळोवेळी सांगत आले, पण त्यांचे निर्णय हे सगळे व्यक्तीगत होते. २००९ पासून त्यांनी वेगळी वाट पकडली,” असे शाहू महाराज म्हणाले.

“ड्राफ्ट म्हणजे कच्चा मसुदा होता. पण ते फायनल झालं असतं आणि मग विचार बदलला असता तर म्हणता येईल की शब्द फिरवला. पण वाटाघाडी चालू असताना, ड्राफ्ट स्टेजमध्ये असल्याने नक्की काही ठरलेलंच नव्हतं. जोपर्यंत त्याच्यावर शिक्कामोर्तब होत नाही, सही होत नाही तोपर्यंत काहीच नक्की नव्हतं. पण जिथे ड्राफ्ट शब्द वापरला म्हणजे त्याचा अर्थ ते कच्चे होते, फायनल झाले नव्हतं,” असेही शाहू महाराज म्हणाले.

दरम्यान, शुक्रवारी संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेत ही राज्यसभा निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं. तसेच, यापुढे ‘स्वराज्य’ संघटनेच्या माध्यमातून मावळ्यांना, गोरगरीब समाजघटकांना एकत्र करण्यासाठी मी मोकळा झालो आहे, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahu maharaj reaction to chhatrapati sambhaji raje rajya sabha candidature abn
First published on: 28-05-2022 at 16:44 IST