सावंतवाडी : दक्षिण महाराष्ट्र आणि कोकण विभागातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी व सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांविरुद्ध एल्गार पुकारण्यासाठी दि. १२ एप्रिल रोजी शाहूवाडी (जि. कोल्हापूर) येथे ‘शेती वाचवा शेती वाचवा’ परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी शेतकरी नेते खासदार राजाराम सिंग असतील, तर माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होणार आहे.

​या परिषदेत प्रामुख्याने वन्य प्राण्यांमुळे होणारे शेतीचे नुकसान, सरकारी प्रकल्पांसाठी होणारी जमिनींची संपादन प्रक्रिया, वाढती महागाई आणि शेतीमालाला मिळणारा अल्प दर यावर आवाज उठवला जाणार आहे. हत्ती, गवे, वाघ आणि डुकरांमुळे शेती व मानवी जीवन धोक्यात आले असून सरकारकडून मिळणारी नुकसान भरपाई अत्यंत तुटपुंजी असल्याचा आरोप आयोजकांनी केला आहे. तसेच, बेकायदेशीर जंगलतोड आणि बॉक्साईट खाणकामामुळे निसर्गाचा ऱ्हास होत असल्याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.

​परिषदेला अखिल भारतीय किसान महासभेचे राष्ट्रीय सचिव पुरुषोत्तम शर्मा, श्रमिक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र बावके, सचिव उद्धव शिंदे, आदिवासी नेते किशोर ढमाले, भाई एस. व्ही. जाधव यांसह अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. शेतकरी कामगार पक्षाचे भाई भारत पाटील हे स्वागताध्यक्ष आहेत.

​सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व कोकण भागातील जास्तीत जास्त शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी या परिषदेला उपस्थित राहावे, असे आवाहन श्रमिक शेतकरी संघटक समितीचे प्रमुख कॉ. अतुल दिघे, बी. के. आमरे, धोंडीबा कुंभार आणि शांताराम परब यांनी केले आहे.