भूकंप करणे संजय राऊत यांच्या हातात नसून देवाच्या हातात आहे असे म्हणत भाजप प्रवक्त्या शायना एन.सी. यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे. जुलै महिन्यात भूकंप करणार असल्याचा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला होता, त्यावर शायना एन.सी. यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. मागच्या तीन वर्षात महाराष्ट्रातले सरकार चांगले काम करत आहे. त्याचमुळे शिवसेनेकडून अशाप्रकारची वक्तव्ये केली जात आहेत. अशी वक्तव्ये करून शिवसेनेला चर्चेत राहायचे आहे म्हणूनच संजय राऊत असली भाषा करत आहेत, असेही शायना एनसी पुण्यात म्हटल्या आहेत.

जनतेसाठी आम्ही सुरू केलेली कामे पाहता, देव आम्हाला सुरक्षितच ठेवेल अशा शब्दात त्यांनी संजय राऊत यांना उत्तर दिले आहे. मागच्या सहा महिन्यात झालेल्या महापालिका, जिल्हा परिषदा निवडणुकांमध्ये शिवसेनेला जनतेने जागा दाखवून दिली आहे असेही शायना एनसी यांनी म्हटले आहे. राज्यातले शेतकरी कर्जमाफीसाठी १० दिवस संघर्ष करत आहेत. यासंदर्भात शायना एनसी म्हटल्या, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत आणि त्यांच्या प्रश्नाबाबत हे सरकार गंभीर आहे.

कर्जमाफीच्या निर्णयाबाबत अभ्यास सुरु आहे, लवकरच याबाबतची घोषणा होईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तर सोलापुरातल्या करमाळ्याच्या शेतकऱ्याच्या आत्महत्येबद्दल आणि त्याच्या सुसाईड नोटबाबत काहीही बोलण्यास त्यांनी नकार दिला आहे. नरेंद्र मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने शायना एनसी पुण्यात आल्या होत्या. त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. एकंदरीत काय तर शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सत्तेत राहून आक्रमक झालेल्या शिवसेनेची, भाजप पर्वा करत नाहीये हेच यावरून सिद्ध होते आहे. तसेच शेतकरी प्रश्नांवरून आमनेसामने आलेल्या या पक्षांमध्ये येत्या काळात वादाच्या आणखीही ठिणग्या उडाल्या तर आश्चर्य वाटायला नको.