​सावंतवाडी: शक्तीपीठ महामार्ग उत्तर व दक्षिण गोवा, रेडी बंदर, मुंबई-गोवा महामार्ग, कोकण एक्स्प्रेस महामार्ग आणि सागरी महामार्गाशी जोडला जावा, यासाठी पुनर्सर्व्हेची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात लवकरच सर्वेक्षण होऊन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीत कोकणसह राज्याच्या हिताचा निर्णय घेतला जाईल, असा विश्वास आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. सावंतवाडी येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब उपस्थित होते.

​मुंबईत झालेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (MSRDC) व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांच्याकडे ही मागणी मांडण्यात आली असून त्यांनी पुन्हा पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. सध्याच्या आराखड्यानुसार या महामार्गाचा स्थानिक व्यापार व बंदरांना अपेक्षित फायदा होणार नाही. त्यामुळे हा महामार्ग मळगाव येथून रेडी बंदर, मुंबई-गोवा महामार्ग व प्रस्तावित कोकण एक्स्प्रेस हायवेला जोडल्यास रेडी बंदराची मालवाहतूक, स्थानिक पर्यटन आणि अर्थकारणाला मोठी गती मिळेल, असे केसरकर यांनी सांगितले.

​बांदा भागातील शेतकऱ्यांचा विरोध आणि फळबागायतींचे होणारे नुकसान टाळण्यासाठी मार्गात बदल प्रस्तावित करण्यात आला आहे. नवीन आराखड्यानुसार आंबोली, चौकुळ पठार, मोर्ले-पारगड व तिलारी मार्गे हा महामार्ग उत्तर आणि दक्षिण गोव्याला जोडला जाईल. यामुळे चौकुळ व दोडामार्ग तालुकाही मुख्य प्रवाहात येईल.

​पाणीपुरवठा व वीज समस्यांवर महत्त्वाचे निर्णय:

​सावंतवाडी रेल्वे टर्मिनस, मळगाव, न्हावेली आणि निरवडे परिसरासाठी नाबार्डच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजना प्रस्तावित असून पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

​भूमिगत वीज वाहिनी, ५६ टक्के हरित आच्छादनामुळे वादळात वीज खंडित होण्याचे प्रमाण जास्त आहे. यासाठी ११५ कोटी रुपयांचा अंडरग्राउंड केबलचा प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे पाठवण्याचे निर्देश ऊर्जा राज्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत देण्यात आले आहेत. या केबल्स जंगलाऐवजी महामार्गावरून टाकल्या जातील.
​
दोडामार्ग तालुक्यातील कमी व्होल्टेजचा प्रश्न सोडवण्यासाठी ‘निरंतर वीज योजने’अंतर्गत गणेशोत्सवापूर्वी ८० नवीन ट्रान्सफॉर्मर बसवले जातील. तसेच आंबोली व चौकुळ गावांसाठी स्वतंत्र वीज वाहिनी व ब्रेकर्स मंजूर करण्यात आले आहेत.