सावंतवाडी: प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गासाठी बांदा शहर परिसरातील तब्बल २१४ एकर जमीन संपादित करण्यात येणार असल्याने शेतकरी, व्यापारी व ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर बांद्याचे आराध्य दैवत श्री देव बांदेश्वर व ग्रामदैवत श्री भूमिका देवी मंदिरात ग्रामस्थांनी सामूहिक गाऱ्हाणे घालत महामार्गाला तीव्र विरोध दर्शविला. बांदा शहरासह परिसरातील नागरिकांनी या प्रकल्पावर ११२ हरकती नोंदवून आपला विरोध प्रशासनाकडे व्यक्त केला आहे.
प्रस्तावित महामार्गामुळे सुपीक शेती, बागायती, घरे, व्यावसायिक आस्थापने तसेच नागरिकांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होणार असल्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली. या आराखड्यात ऐतिहासिक व धार्मिक महत्त्वाच्या ब्राह्मण देवळाचाही समावेश असल्याने स्थानिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने या प्रकल्पासाठी पर्यायी मार्गाचा गांभीर्याने विचार करावा, अशी ठाम मागणी स्थानिकांकडून करण्यात आली आहे.
महामार्गाविरोधात बांदा परिसरातून दाखल करण्यात आलेल्या ११२ हरकतींमध्ये जमिनींचे होणारे नुकसान, संभाव्य विस्थापन, पर्यावरणीय परिणाम तसेच शेती व व्यापारावर होणाऱ्या विपरीत परिणामांचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.
प्रस्तावित भूसंपादनाच्या आराखड्यानुसार बांदा परिसरातील विविध गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर जमीन संपादित केली जाणार आहे. यात बांदा शहरातील २१४ एकर, डेगवे १०२ एकर, पडवे-माजगाव ४३ एकर, पडवे ३० एकर, असनीये ४५ एकर, दाभील २७ एकर, घारपी ८ एकर, फणसवडे १४० एकर, नेने २५ एकर, उडेली ६० एकर, केगद १६० एकर, झोळंबे ७० एकर, फुकेरी ४५ एकर आणि कुंभवडे येथील ६५ एकर क्षेत्राचा समावेश आहे.
सामूहिक गाऱ्हाण्याच्या वेळी उपस्थितांनी संतप्त भावना व्यक्त करताना, “शक्तीपीठ महामार्गाच्या नावाखाली बांदा परिसराचा विकास नव्हे, तर पूर्णपणे विनाश होणार आहे,” असा आरोप केला.
स्थानिकांच्या शेती, घरे आणि उपजीविकेचा मानवतेच्या दृष्टीने विचार करून प्रस्तावित आराखड्यात त्वरित बदल करावा; अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. बांदा परिसरातून वाढत असलेला विरोध आणि मोठ्या प्रमाणावर दाखल झालेल्या हरकतींमुळे शक्तीपीठ महामार्गाचा हा विषय आता राज्यस्तरावरही गाजू लागला आहे.या सामूहिक गाऱ्हाण्यावेळी बांदा सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच रत्नाकर आगलावे, देवस्थान समिती अध्यक्ष राजाराम (बाळू) सावंत, ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब, अरुण मोर्ये, गजानन गायतोंडे, मकरंद मोर्ये, समीर सावंत यांच्यासह महामार्गबाधित शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
