सांगली : शक्तीपीठ रद्द करा, शेतकरी वाचवा अशा घोषणा देत शुक्रवारी शेतकरी बचाव कृती समितीच्यावतीने हजारो शेतकर्‍यांचा ईश्‍वरपूरमध्ये मोर्चा काढण्यात आला. संपूर्ण वाळवा तालुका सिंचनाखाली असताना शक्तीपीठ महामार्गामुळे शेती उध्वस्त होणार असल्याने हा महामार्ग रद्द करण्यात यावा अशी आग्रही मागणी मोर्चाच्यावतीने तहसिलदारांना निवेदन देउन करण्यात आली.

पंचायत समितीमधील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून एल्गार मोर्चाला सुरूवात झाली. शहरातील प्रमुख मार्गावरून कचेरी चौकात मोर्चा आल्यानंतर सभेत रूपांतर झाले. तालुक्याच्या विविध गावातून शेकडो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते. मात्र, मोर्चात कोणताही झेंडा नव्हता, सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते शेतकरी म्हणून या मोर्चात सहभागी झाले होते.

शक्तीपीठ महामार्गामुळे कृष्णा व वारणा नदीच्या खोर्‍यातील जमीन संकटात येणार असून महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीशिवाय शिक जमिनही पाण्याचा निचरा न झाल्याने पडिक होणार आहे. वाळवा तालुययातील शेती आणि शेतकरी उध्वस्त करणारा महामार्गच रद्द करावा अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. कोणाचीही मागणी नसताना बांधण्यात येत असलेला शक्तीपीठ महामार्ग हा शेतकर्‍यांच्या जीवावर उठणारा महामार्ग ठरणार असल्याने शासनाने याची दखल घेउन हा महामार्गच रद्द करणे आवश्यक असल्याचे मत अनेक शेतकरी व कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केले.

या मोर्चामध्ये माजी खासदार राजू शेट्टी यांनी निवडणुकीत  मताला पाच-पाच हजार देउन सत्ता मिळवण्याच्या राजकारणासाठी महामार्ग निर्मितीचा धंदा मांडला असल्याचा टीका यावेळी केली. या महामार्गामुळे बागायती शेती उध्वस्त होणार असूुन शेतकरी देशोधडीला लावणारा शक्तीपीठ महामार्ग रद्दच झाला पाहिजे असे सांगितले.

यावेळी राज्य साखर महासंघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, कॉ. धनाजी गुरव, डॉ.भारत पाटणकर, राजवीर पाटील, बी.जी. काका पाटील, शहाजी पाटील, अभिजित पाटील, विजयबापू पाटील, गिरीष मोटे, सुस्मिता पाटील आदींनी यावेळी महामार्गाच्या विरोधात भूमिका मांडली.