कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतून रिकामे झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांचे पुन्हा एकदा शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाकडे लक्ष वेधले आहे. शक्तिपीठ महामार्गाचे संरेखन बदलले असले तरी त्याच्या विरोधात आंदोलनाची भूमिका कोल्हापुरात महाविकास आघाडीने जाहीर केली आहे. सांगली जिल्ह्यात या प्रश्नावर मोर्चा काढला जाणार आहे. अशातच आगामी काही महिन्यांत कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे साडेचारशे ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शक्तीपीठ महामार्गाचे महामार्ग साकारण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. शक्तिपीठ महामार्गाचे संरेखन बदलले जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. या प्रकल्पाचा खर्चही आता वाढलेला आहे. महामार्गाच्या संरेखनामध्ये बदल झाला असला तरी प्रकल्पाच्या विरोधाची भूमिका कायम राहिल्याने त्याची धग तापत्या उन्हात वाढण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर तापणार

कोल्हापूर जिल्हा परिषदेतत विजयी झालेल्या महाविकास आघाडी – इंडिया आघाडीच्या सदस्यांचा सत्कार समारंभ कोल्हापूर जिल्हा काँग्रेस भवनात आयोजित करण्यात आला होता. यावेळी विधान परिषदेचे गट नेते, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी शक्तिपीठ महामार्गाचा खर्च ८० हजार कोटी वरून १ लाख ५ हजार कोटीवर गेला आहे. या प्रकल्पामुळे पश्चिम महाराष्ट्रातील बारमाही सुपीक जमीन शेतकऱ्यांच्या हातून कायमची जाणार आहे. या महामार्गाचे संरेखन बदलण्यात आले असले तरी त्या विरोधात आंदोलनाची भूमिका येत्या काळात आक्रमकपणे नेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केल्याने कोल्हापूर जिल्ह्यात आंदोलन तापण्याची चिन्हे दिसू लागले आहेत.

सत्ताकारणाचे अर्थकारण

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी याच कार्यक्रमात प्रकल्पातून सत्ताधाऱ्यांच्या सत्ताकारण आणि अर्थकारणावर याची सांगड उलगडून दाखवली. १ लाख ५ हजार कोटीच्या या प्रकल्पातून राज्यातील सत्ताधाऱ्यांना ५० हजार कोटी रुपये कमवायचे आहेत, असा आरोप करून राजू शेट्टी यांनी हाच पैसा २०२९ सालच्या निवडणुकीसाठी वापरून पुन्हा सत्तेवर येण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. रस्त्याच्या कामाचा ठेका सत्ताधारी आमदारांना द्यायचा आहे. चार आणे खर्च करून रुपया खर्च पडला असे दाखवण्याची त्यांची चाल आहे. हे रोखायचे असेल तर खेड्यातील लोकांनी पायातील कोल्हापुरी पायतान घट्ट ठेवावे. मी आणि सतेज पाटील त्यांचा प्रयत्न उधळून लावण्यासाठी सज्ज आहोत, असे सांगत आगामी काळात आंदोलनाची भूमिका कायम असल्याचे जाहीर केले आहे.

सांगलीतही आंदोलन

दुसरीकडे, सांगली जिल्ह्यातही महामार्गाविरोधात भूमिका घेतली जात आहे. शक्तिपीठ महामार्गाचे संरेखन बदलून चालणार नाही तर महामार्गच रद्द करण्यात यावा या मागणीसाठी शक्तिपीठ महामार्ग समितीच्या वतीने मोर्चाचे आयोजन केले आहे. पाठोपाठ कोल्हापुरातही अशा प्रकारचे आंदोलन सुरू होणार आहे.

ग्रामपंचायतीत मुद्दा गाजणार

जिल्हा परिषदेच्या निवडणुका संपल्यानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. ग्रामीण भागात शक्तीपीठ प्रकल्पाचे समर्थक आणि विरोधक अशा दोन्ही गटांचे समर्थक गावोगावी आहेत. त्यांच्याकडून शक्तिपीठ महामार्गाच्या फायद्या तोट्यांची चर्चा अहमिकेने होणार हे उघड आहे. यामुळे गावगाड्यात शक्तीपीठ महामार्गाचा मुद्दा चर्चेच्या ऐरणीवर राहणार असून त्याचे कोणते राजकीय परिणाम होणार याकडे जाणकारांचे लक्ष वेधले आहे.