सावंतवाडी : शक्तीपीठ महामार्गाची नवीन आखणी (अलायनमेंट) केली जात असताना, हा प्रस्तावित मार्ग राधानगरीमार्गे सिंधुदुर्ग जिल्ह्यात उतरवण्यात यावा, अशी मागणी कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केली आहे. यामुळे गोव्याऐवजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन आणि व्यापाराला खऱ्या अर्थाने चालना मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले. कणकवली येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
श्री. पारकर म्हणाले की, राधानगरी ते सिंधुदुर्ग हे अंतर सुमारे ३० किमी आहे. हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग ६६ (NH 66) ला जोडला जावा किंवा सह्याद्रीच्या पायथ्याशी समांतर नवीन ग्रीनफिल्ड मार्ग विकसित करून तो बांद्यापर्यंत नेण्यात यावा. या निर्णयामुळे सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या गावांचा विकास होऊन रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील.
प्रस्तावित संकेश्वर-रेड्डी चौपदरीकरण आणि घोटगे-पाटगाव मार्गाशी या महामार्गाची सांगड घातल्यास कोल्हापूर-सिंधुदुर्ग प्रवासाचा वेळ ३.५ तासांवरून अवघ्या १ ते १.५ तासांवर येऊ शकतो. तसेच, कणकवली, ओरोस, कुडाळ आणि सावंतवाडी या मुख्य शहरांना महामार्गाशी थेट जोडणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
गोव्यापेक्षा महाराष्ट्राच्या हिताला प्राधान्य:
सध्याच्या आराखड्यामुळे सिंधुदुर्गापेक्षा गोव्याला अधिक लाभ होण्याची शक्यता पारकर यांनी वर्तवली. ते म्हणाले, “हा प्रकल्प महाराष्ट्र शासनाचा असल्याने त्याचा प्राथमिक फायदा राज्यातील जिल्ह्यांनाच मिळायला हवा. जर महामार्ग थेट गोव्यात गेला, तर पर्यटक सिंधुदुर्ग टाळून पुढे जातील, ज्यामुळे जिल्ह्याचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.”
पर्यटन आणि धार्मिक स्थळांचा विकास:
राधानगरीमार्गे मार्ग आल्यास सिंधुदुर्ग किल्ला, विजयदुर्ग, दाजीपूर अभयारण्य, आंबोली यांसारख्या पर्यटन स्थळांसह कुणकेश्वर, आंगणेवाडी आणि माणगाव यांसारख्या धार्मिक स्थळांनाही मोठा फायदा होईल. तसेच चिपी विमानतळ, देवगड आणि रेड्डी बंदरांशी कनेक्टिव्हिटी मिळाल्यास संपूर्ण कोकणच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
