सावंतवाडी:  राज्यातील महत्त्वाकांक्षी आणि सुमारे एक लाख कोटी रुपये खर्चाच्या ‘शक्तिपीठ महामार्ग’ प्रकल्पात सरकारने मोठे बदल करत सुधारित आराखड्याला मंजुरी दिली आहे. शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आणि पर्यावरणीय मुद्द्यांमुळे या प्रकल्पाच्या मूळ मार्गात बदल करण्यात आले असून, यामुळे आता सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. हा बदल कोकणातील या भागासाठी विकासाच्या नव्या शक्यता घेऊन आला असला, तरी पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रातील या महामार्गामुळे पर्यावरणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

​काय आहे नव्या आराखड्यातील बदल?

​पूर्वीचा आराखडा वर्धा जिल्ह्यातील पवनार ते गोवा सीमेवरील पत्रादेवीपर्यंत होता. मात्र, स्थानिक विरोध आणि जैवविविधतेचे प्रश्न लक्षात घेऊन, आता हा मार्ग दिग्रज (जि. वर्धा) ते बांदा (ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) असा निश्चित करण्यात आला आहे. सुधारित आराखड्यानुसार महामार्गाची एकूण लांबी ८०२ किलोमीटरवरून ८५६.७६५ किलोमीटर झाली आहे.

यापुर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे ३८ किलोमीटर लांबीचा आणि १०० मीटर रुंदीचा हा महामार्ग जिल्ह्यातील तेरा गावांतून जाणार होता, ज्यासाठी अंदाजे ३८० हेक्टर जमिनीचे संपादन करावे लागणार होते. या महामार्गामध्ये सावंतवाडी तालुक्यातील १२ आणि दोडामार्ग तालुक्यातील १ गावाचा समावेश आहे. यात सावंतवाडी तालुक्यातील गेळे, आंबोली, वेर्ले, पारपोली, नेने, फणसवडे, उडेली, घारपी, तांबोळी, असनिये, डेगवे, बांदा आणि दोडामार्ग तालुक्यातील फुकेरी या गावांचा समावेश होता. आता पूर्वीच्या आराखड्यातील गेळे ते तांबोळीपर्यंतची ८ गावे आता वगळण्यात आली आहेत.

नव्याने समाविष्ट गावे:

​सावंतवाडी तालुका: केगद, डेगवे, बांदा, पडवे आणि माजगाव तर दोडामार्ग तालुका: कुंभवडे, भेकुर्ली, कोलझर, तळकट आणि झोळंबे या गावांचा समावेश करण्यात आला आहे.हा महामार्ग आता आजरा–चंदगड – दोडामार्ग मार्गे सावंतवाडीतील बांदा – पत्रादेवी – गोवा ला जोडला जाणार आहे, ज्यामुळे हा दुर्गम भाग थेट द्रुतगती मार्गाच्या नकाशावर येणार आहे.

​प्रकल्पाचे महत्त्व आणि उद्दिष्टे

​प्रवासाचा वेळ: नागपूर ते गोवा हा प्रवास सध्याच्या १८ तासांवरून केवळ ८ तासांपर्यंत कमी होण्याचा दावा करण्यात आला आहे.

​धार्मिक पर्यटन: हा महामार्ग माहूर, औंढा नागनाथ, परळी वैद्यनाथ, अंबाजोगाई, तुळजापूर, पंढरपूर, कोल्हापूरची महालक्ष्मी, पन्हाळा-ज्योतिबा आणि रेडीचा गणपती मंदिर ३२ किलोमीटर अंतरावर यासह २१ प्रमुख धार्मिक स्थळांना जोडणार आहे. यामुळे धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे.

​विकासाला गती: सावंतवाडी–दोडामार्ग पट्टा या प्रकल्पाचा “हायलाइट झोन” ठरणार असून, यामुळे वाहतूक, व्यापार आणि पर्यटनाच्या संधी वाढणार आहेत.

पर्यावरणीय चिंतेचा मुद्दा

​विकास जरी महत्त्वाचा असला तरी, या नव्या मार्गामुळे पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या आहेत. पूर्वी गेळे ते डेगवे दरम्यान ३० किमीचा बोगदा प्रस्तावित होता, ज्याला आंबोलीच्या जैवविविधतेमुळे विरोध झाला होता. आता नव्याने समाविष्ट झालेली कोलझर, तळकट, झोळंबे, पडवे आणि माजगाव ही गावे केंद्र शासनाने ‘इको-सेंसिटिव्ह झोन’ म्हणून जाहीर केली आहेत. या संवेदनशील भागातून महामार्ग जाणार असल्याने पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांबाबत स्थानिक नागरिक आणि पर्यावरणवाद्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

पुढील आव्हाने:

​राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत राबवल्या जाणाऱ्या या प्रकल्पात आता भूसंपादन, स्थानिकांचे पुनर्वसन आणि पर्यावरणीय समतोल राखणे ही प्रशासनासमोरची मोठी आव्हाने आहेत. या महामार्गाची यशस्विता स्थानिक लोकांचा विश्वास जिंकण्यावर आणि विकासासोबतच निसर्गाचे संरक्षण करण्यावर अवलंबून राहणार आहे.

​शक्तिपीठ महामार्गाचे पुनर्रेखांकन पश्चिम घाटासाठी धोक्याची घंटा; डॉ. जयेंद्र परुळेकर यांचा इशारा

नियोजित शक्तिपीठ महामार्गाचे पुनर्रेखांकन करण्यात आले असून, हा नवीन मार्ग आता पश्चिम घाटातील अतिसंवेदनशील आणि जैवविविधतेने नटलेल्या भागातून जाणार आहे. नागांचा राजा असलेला किंग कोब्रा, पट्टेरी वाघ, हत्ती आणि बिबट्यांचे वैभव असलेल्या या निसर्गसंपन्न क्षेत्राला हा महामार्ग धोकादायक ठरेल, अशी भीती ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी व्यक्त केली आहे.

​ शक्तिपीठ महामार्गाचे नवे मार्गक्रमण आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील केगद, कुंभवडेतून तळकट, झोळंबे मार्गे डेगवे-बांदा अशा अतिशय संवेदनशील भागातून होणार आहे. या प्रकल्पासाठी असंख्य महाकाय वृक्षांची बेसुमार तोड केली जाण्याची शक्यता असून, यामुळे निसर्गाचे कधीही भरून न येणारे नुकसान होईल.

​आपल्या भूमिकेचे समर्थन करताना डॉ. परुळेकर यांनी अलीकडच्या काही घटनांचा उल्लेख केला. ते म्हणाले की, “हल्लीच सरमळे गावात अतिशय दुर्मिळ अशा ‘किंग कोब्रा’चे दर्शन घडले आहे. काही दिवसांपूर्वी तळकट येथेही असाच नागराज दिसला होता. ज्या भागात किंग कोब्रासारखी दुर्मिळ प्रजाती आणि पट्टेरी वाघ, बिबट्या, हत्ती, गवे यांसारखे प्राणी वावरत आहेत, तिथे लाखो झाडांची कत्तल करणे हे शहाणपणाचे आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

​यावेळी त्यांनी सत्ताधारी मंडळींवरही जोरदार टीकास्त्र सोडले. “नागराजाचे वारंवार दर्शन होणे हा निसर्गाचा कोणता संकेत आहे? अघोरी आणि भोंदू प्रवृत्तींच्या मागे लागणाऱ्या सत्ताधाऱ्यांना हे ईश्वरी संकेत कळतील का? अशी चर्चा आज सामान्य जनतेत रंगली आहे,” असेही डॉ. परुळेकर यांनी पत्रकात नमूद केले आहे.

​पर्यावरणाचा समतोल राखून विकास साधण्याऐवजी, निसर्गाचा बळी देऊन महामार्ग रेटला जात असल्याबद्दल त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

पर्यावरण मित्र संदीप सावंत (असनिये) म्हणाले, असनीये सह सह्याद्रीच्या पट्ट्यात लोह खनिज प्रकल्प लिज आहेत. या ठिकाणी प्रकल्प होण्यासाठी प्रयत्न सुरू होते. त्यासाठी जैवविविधता, विपुल वनसंपदा आणि पशु पक्षी वैभव बहरत आहे. हे न्यायालयात आम्ही वनशक्ती संस्थेच्या माध्यमातून मांडले. शेड्युल एक मधील वन्य प्राणी असल्याचे दाखवून दिले. त्यामुळे न्यायालयाने इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये गावांचा समावेश करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारला निर्देश दिले. आता तर इको सेन्सिटिव्ह झोन जाहीर झालेल्या कुभंवडे,केगद, तळकट, झोळंबे,कोलझर भागातून शक्तीपीठ महामार्गाचा आराखडा मंजूर झाला असल्याचे ऐकून आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळले.