सावंतवाडी : नागपूर ते गोवा या महत्त्वाकांक्षी ‘महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाच्या’ सुधारित आराखड्याला राज्य सरकारने अधिकृत मंजुरी दिली असून यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने शासन निर्णय निर्गमित केला आहे. या नवीन आराखड्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १३ गावांच्या मार्गात मोठे बदल झाले आहेत.

​सिंधुदुर्गातील नवी आखणी आणि गावे

सुधारित प्रस्तावानुसार, पूर्वीच्या आराखड्यातील गेळे, आंबोली, वेर्ले, पारपोली, फणसवडे, असनिये, तांबोळी आणि फुकेरी ही गावे वगळण्यात आली आहेत. त्याऐवजी आता सावंतवाडी तालुक्यातील केगद, डेगवे, पडवे माजगाव व बांदा आणि दोडामार्ग तालुक्यातील कुंभवडे, भेकुर्ली, कोलझर, तळकट व झोळंबे या गावांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. आता दहा गावे समाविष्ट करण्यात आली आहेत.

​पर्यावरणीय चिंतेचा विषय

नव्याने समाविष्ट करण्यात आलेली कोलझर, तळकट, झोळंबे आणि पडवे माजगाव ही गावे केंद्र शासनाच्या ‘इको सेन्सिटिव्ह झोन’मध्ये येतात. हा भाग ‘व्याघ्र कॉरिडॉर’ म्हणूनही ओळखला जातो. तसेच या भागात लोह खनिजाचे मोठे साठे आहेत. त्यामुळे या संवेदनशील भागातून महामार्गाची आखणी करणे हा भविष्यात चिंतनाचा विषय ठरू शकतो.

​महामार्गाची वैशिष्ट्ये

  • एकूण लांबी : ८५६.७६५ कि.मी. (पवनार, वर्धा ते बांदा-सावंतवाडी, सिंधुदुर्ग).
  • जिल्हे : वर्धा, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधून हा मार्ग जाणार आहे.
  • ​सध्या नागपूर ते गोवा प्रवासाला १८ तास लागतात, जो या महामार्गामुळे अवघ्या ८ तासांवर येणार आहे.
  • धार्मिक महत्त्व : माहूर, तुळजापूर आणि कोल्हापूर या शक्तीपीठांसह एकूण २१ धार्मिक स्थळे या मार्गामुळे जोडली जातील.
  • ​महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून हा सुधारित प्रस्ताव सादर केला होता. या नव्या आखणीमुळे भूसंपादनातील अडथळे दूर होऊन कामाला गती मिळेल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे.

केंद्र सरकारच्या माध्यमातून इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये समावेश करण्यात आलेल्या गावांतून हा नियोजित शक्तीपीठ महामार्गाचा आराखडा तयार केला आहे. प्रत्यक्षात सर्वेक्षण आणि मोजणी सुरू होईल तेव्हा शेतकऱ्यांची भूमिका समोर येईल असे बोलले जात आहे.