सोलापूर : राज्यात दुष्काळाची दाहकता तीव्र असताना शेतकऱ्यांना विश्वासात न घेता, पोलीस बळाचा गैरवापर करून ‘शक्तीपीठ महामार्गा’साठी सुरू असलेली संयुक्त मोजणी तात्काळ थांबवावी, अशी मागणी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी गुरुवारी सोलापूर जिल्हा प्रशासनाकडे केली. शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असतानाही पोलीस बळाचा धाक दाखवून जमिनी बळकावण्याचा प्रयत्न झाल्यास आम्ही स्वतः शेतात उभे राहून मोजणी रोखू, असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) नेते माजीमंत्री जयंत पाटील, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील, सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे आणि माढाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली बाधित शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर शेतकऱ्यांनी ‘एकच जिद्द, शक्तीपीठ रद्द’ आणि ‘जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’ अशा घोषणा देत जोरदार निदर्शने केली. चार दिवसापूर्वीच सोलापूर जिल्ह्यातील तुळशी ( तालुका माढा) येथे शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीचे गावकऱ्यांनी स्वागत केले होते. मोजणी यंत्राची पूजा करण्यासह पथकाचा सत्कारही काही शेतकरी, गावकऱ्यांनी केला होता.
महसुलाचे काम पोलिसांकडून – जयंत पाटील : माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार पक्षाचे )ज्येष्ठनेते जयंत पाटील यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. “शेतकऱ्यांची संमती नसताना शेकडो पोलिसांचा ताफा घेऊन जाणे, शेतकऱ्यांना घेराव घालून मोजणी करणे हे लोकशाही व्यवस्थेत योग्यच नाही. महसूल प्रशासनाचे काम आता पोलीस करताना दिसत आहेत. दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ ५ हजार रुपये देऊन थट्टा केली जात आहे. जर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारकडे निधी नसेल, तर या महामार्गासाठी निधी कुठून येतो? जुन्या कंत्राटदारांची १ लाख कोटी रुपयांची बिले थकीत ठेवून केवळ ५-१० टक्के रक्कम गुंतवून नवीन कामांचे वाटप करण्याचा उद्योग सुरू आहे. एका व्यक्तीचा हट्ट बाजूला ठेवून सरकारने दुष्काळ निवारणाला प्राधान्य द्यावे,” अशी टीका पाटील यांनी केली.
‘हुडको’चे कर्ज काढून प्रकल्प कोणासाठी? : सतेज पाटील काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी प्रकल्पाच्या आर्थिक व्यवहार्यतेवर प्रश्न उपस्थित केले. “१२ जिल्ह्यांतून जाणाऱ्या या प्रकल्पाचा मूळ खर्च ८६ हजार कोटींवरून आता १ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. केवळ जमीन अधिग्रहणासाठी २२ ते २८ हजार कोटी रुपये लागणार आहेत. तत्कालीन वित्तमंत्र्यांनी व वित्त विभागाने ‘हा प्रकल्प सरकारला परवडणारा नाही आणि गरजेचाही नाही’ अशी नोंद फाइलवर केलेली आहे. तरीही ‘हुडको’कडून कर्ज काढून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा हा महामार्ग कोणाच्या फायद्यासाठी लादला जातोय? सोलापूर जिल्ह्यात जबरदस्तीने मोजणी केल्यास खासदार मोहिते-पाटील आणि आम्ही स्वतः शेतात उभे राहून ती रोखू,” असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला.
पडळकरांनी आश्वासनांचे उत्तर द्यावे
एसटी कर्मचाऱ्यांच्या संभाव्य संपाचा दाखला देत काँग्रेस नेते पाटील यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर निशाणा साधला. “एसटी कर्मचाऱ्यांना दिलेली आश्वासने हवेत विरली आहेत, त्याचे उत्तर आधी पडळकरांनी द्यावे. ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेल्या एसटीला अर्थसाह्य न देता, खाजगीकरणाच्या नावाखाली महामंडळ संपुष्टात आणण्याचा पद्धतशीर डाव सुरू आहे,” असा आरोपही त्यांनी केला.
