scorecardresearch

शंभुराज देसाईंचा संजय राऊतांवर हल्लाबोल; ‘त्या’ आरोपांवर बोलताना म्हणाले “…म्हणूनच त्यांच्या बोलण्यात ताळमेळ नाही”

निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव तसेच धनुष्यबाण निवडणूक चिन्ह शिंदे गटाला दिले आहे.

shambhuraj desai and sanjay raut
शंभुराज देसाई, संजय राऊत (संग्रहित फोटो)

निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव तसेच धनुष्यबाण निवडणूक चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. निवडणूक आयोगाचा निर्णय एकतर्फी आणि ‘मेरी मर्जी’वाल्यांच्या मर्जीसाठी दिलेला निर्णय आहे. शिवसेना पक्षनाव आणि चिन्ह हे दडपशाही, दबाव, पैसा, सत्ता यामाध्यमातून मिळवलं आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. या निकालासाठी मागील पाच महिन्यात २ हजार कोटींच्या पॅकेजचा वापर करण्यात आला, असेही राऊत म्हणाले आहेत. राऊतांच्या याच दाव्यावर शिवसेनेचे (शिंदे गट) नेते शंभुराज देसाई यांनी राऊतांवर पलटवार केला आहे. ते आज (२१ फेब्रवारी) माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

हेही वाचा >>> “उद्धव ठाकरेंनी धमकीच दिली,” भगतसिंह कोश्यारींच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान; म्हणाले, “माझ्या माहितीनुसार…”

…म्हणून त्यांच्या बोलण्यात ताळमेळ राहिला नाही

“संजय राऊत संदर्भहीन बोलतात. विसंगत बोलतात. संजय राऊत काहीही म्हणत असले तरी आम्ही पाहिल्यापासून सांगत आहोत, आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे. मात्र अगोदर न्यायव्यवस्थेवर आक्षेप घेणारे, न्यायालयाच्या कामकाजावर शंका व्यक्त करणारे संजय राऊत आज आमचा न्यायालयच आधार वाटतोय असे का म्हणत आहेत. ते विसंगत बोलत आहेत. मागच्या काळात तीन-साडेतीन महिने आराम करून आल्यामुळे त्यांच्या बोलण्यात ताळमेळ राहिलेला नाही, असे त्यांच्या वक्तव्यावरून दिसत आहे,” असे शंभुराज देसाई म्हणाले.

हेही वाचा >>> संजय राऊतांच्या ‘२ हजार कोटीं’च्या आरोपावर देवेंद्र फडणवीसांचे जशास तसे उत्तर; म्हणाले, “अशा निर्बुद्ध…”

सुनावणी सुरू असताना बोलणे योग्य नाही

शंभुराज देसाई यांनी आमदारांची अपात्रता तसेच सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सत्तासंघर्षाच्या खटल्यावरही भाष्य केले आहे. “कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीवर कोर्टाच्या बाहेर बोलणे योग्य वाटत नाही. आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या खटल्यात तीन दिवस सलग सुनावणी चालणार आहे. तेथे युक्तिवाद होतील. त्यानंतर काहीतरी ठोस निर्णय घेण्यात येईल. सुनावणी सुरू असताना त्यावर आपण बोलणे योग्य वाटत नाही,” अशी प्रतिक्रिया शंभुराज देसाई यांनी दिली.

हेही वाचा >>> ‘माझा विनायक मेटे करण्याचा डाव,’ अशोक चव्हाणांच्या आरोपानंतर प्रताप पाटील चिखलीकर आक्रमक; म्हणाले “त्यांनी…”

मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार?

आगामी अधिवेशनाच्या अगोदर राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे, असेही देसाई यांनी सांगितले. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे सांगितलेले आहे. त्यामुळे कदाचित या अधिवेशनाच्या अगोदर मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यावर चर्चा करून निर्णय घेण्याची शक्यता आहे,” असे देसाई म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-02-2023 at 15:49 IST
ताज्या बातम्या