अहिल्यानगर: प्रसिद्ध श्री क्षेत्र शनिशिंगणापूर देवस्थानने तब्बल १६७ कर्मचाऱ्यांना कामावरून काढले असून यामध्ये एका समाजाच्या ११४ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ट्रस्टचे कार्यकारी अधिकारी गोरख दरंदले यांनी ही कारवाई अनियमितता व शिस्तभंगामुळे केल्याचे सांगितले. असे असले तरी हिंदुत्ववादी संघटनांनी या कर्मचाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती.
२१ मे रोजी काही कामगारांनी मंदिराच्या व्यासपीठावर ग्रिल बसवण्याचे काम केले. या घटनेनंतर महाराष्ट्र मंदिर महासंघ व हिंदू संघटनांनी विरोध दर्शवला होता. या कर्मचाऱ्यांना तात्काळ हटवा, अन्यथा उद्या, शनिवारी मोर्चा काढण्याचा इशारा संघटनांनी दिला होता. या मोर्चाचे नेतृत्व आमदार संग्राम जगताप, भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले करणार आहेत.
ट्रस्टने सांगितले की, या कर्मचाऱ्यांपैकी कोणीही गर्भगृहात नेमलेले नव्हते. ते मुख्यतः शेती, कचरा व्यवस्थापन आणि शिक्षण विभागात कार्यरत होते. यातील ९९ कर्मचारी मागील काही महिन्यांपासून गैरहजर होते, उरलेल्यांपैकी काहीजणांना २० वर्षांहून अधिकचा अनुभव होता.
मोर्चाच्या आदल्या दिवशीच ट्रस्टने हा निर्णय घेऊन सर्व कर्मचाऱ्यांची सेवा संपवली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना रजिस्टर पत्राने त्यांची सेवा १२ जूनपासून संपवण्याचे कळविण्यात आल्याचे कार्यकारी अधिकारी गोरख दरंदले यांनी सांगितले.
देवस्थानने अद्यापि आंदोलकांना लेखी अथवा कोणत्याही पद्धतीचे कळवलेले नाही, त्यामुळे उद्या मोर्चा आणि आंदोलन हे होणारच असल्याचे आंदोलनाचे आयोजक ऋषिकेश शेटे यांनी सांगितले.