अहिल्यानगर: शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्वर देवस्थान विश्वस्त संस्थेतील गेल्या पाच वर्षातील गैरव्यवहार शोधण्यासाठी तसेच आर्थिक चुका शोधण्यासाठी गेल्या ५ वर्षातील कारभाराचा ‘फॉरेन्सिक ऑडिट’ सुरू करण्यात आल्याची माहिती देवस्थानचे प्रशासक तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी आज, शुक्रवारी नगरमध्ये पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
नाशिक विभागीय आयुक्त डॉ. गेडाम आज नगरमध्ये होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना वरील माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, देवस्थानचे कार्यकारी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे आदी उपस्थित होते.
ते म्हणाले, देवस्थानमध्ये सध्या २३८४ कर्मचारी कार्यरत आहेत. इतक्या कर्मचाऱ्यांची आवश्यकता नाही. त्याचा अहवाल राज्य सरकारला पाठवला आहे. देवस्थानच्या रुग्णालयात ८० खाटा आहेत मात्र अनेक कर्मचारी जास्तीचे आहेत. देवस्थानकडे १७ बस आहेत मात्र चालक ७२ आहेत. असे इतरही काही उदाहरणे आहेत.
भाविक जो देणगी स्वरूपात पैसा देतात, त्याचा योग्य विनियोग झाला पाहिजे. भाविकांसाठी सुविधा निर्माण व्हायला हव्यात, यासाठी प्रयत्न केले जात आहेत भाविकांच्या विश्वासाला तडा जाऊ नये यासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे.
सध्याची आपली प्रशासक म्हणून भूमिका केवळ दैनंदिन कारभारासाठी आहे का धोरणात्मक निर्णय घेता येतील यासंदर्भात राज्य सरकारकडून मार्गदर्शन मागवल्याची त्यांनी सांगितले. यापूर्वी राज्य सरकारने धर्मदाय आयुक्तांमार्फत देवस्थानची चौकशी केली. त्यामध्ये अनेक गैरप्रकार निदर्शनाला आले. संस्थेसाठी कारभार करताना काही आर्थिक चुका झाल्या आहेत का, त्याची वसुली करायची आहे का, यासाठीही फॉरेन्सिक ऑडिटचा उपयोग होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या पाच वर्षातील फॉरेनची ऑडिट सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
देवस्थानचा कारभार हा सार्वजनिक विश्वस्त संस्था म्हणून व्हायला हवा, तो खाजगी कंपनी सारखा व्हायला नको अशी टिप्पणीही त्यांनी केली. शनिशिंगणापूर येथील ‘लटकूं’चा भाविकांना होणारा त्रास याकडे लक्ष वेधले असता, विभागीय आयुक्त गेडाम यांनी सांगितले की अशा लटकूंवर ४१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एकापेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या लटकूंवर वेगळ्या स्वरूपात कारवाई करण्यासाठी आपण विशेष पोलीस महानिरीक्षकांशी बोलू.
शिळेची पुरातत्व विभागाकडून तपासणी
शनिदेवाच्या शिळेला भेसळयुक्त तेलामुळे काही हानी पोहोचते का याची पुरातत्व विभागाच्या तज्ज्ञांनी पाहणी केली. त्याचा अहवाल अद्याप प्रलंबित असल्याचे प्रशासक गेडाम यांनी सांगितले. शनिदेवाला अर्पण केल्या जाणाऱ्या भेसळयुक्त तेलाला प्रतिबंध करण्यासाठी देवस्थानकडे यंत्रणा आहे, मात्र बाहेरील दुकानदारांवर निर्बंध आणण्यासाठी नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
