नांदेड : भोकर नगर परिषद क्षेत्रात काँग्रेसच्या मागील दोन राजवटींच्या काळात पूर्ण झालेल्या वेगवेगळ्या कामांना आता भाजपाच्या जाहीरनाम्यामध्ये स्थान मिळाले आहे. त्यात भाजपा नेत्यांसोबत काँग्रेसचे नेते, दिवंगत शंकरराव चव्हाण यांचेही छायाचित्र छापण्यात आले आहे. भोकर शहराच्या विकासात भर घालणारी अनेक कामे झाल्यानंतर भाजपाने आता आठ नवे संकल्प जाहीर केले.

त्यात भूमिगत गटार योजना, भोकर एमआयडीसीत नवे उद्योग आणणे, शहराच्या विविध भागांत सुसज्ज व्यापारी संकुले विकसित करणे, शहराच्या विविध भागांत रस्त्यांची निर्मिती करणे आण गरजू विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका इत्यादी आश्वासने त्यात दिली आहेत.

भोकर शहर सुंदर आणि स्वच्छ करण्याचे वचन या पक्षाने दिले आहे. जिल्ह्यातील १२ नगर परिषदा आणि हिमायतनगर नगरपंचायतीच्या निवडणुकांचे मतदान अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपले आहे. पण भाजपाने भोकर नगर परिषदेसाठी जारी केलेला वचननामा वगळता इतर प्रमुख राजकीय पक्ष जाहीरनाम्याविना मतदारांना सत्तेसाठी साद घालत आहेत. भाजपाने भोकर नगर परिषदेची सत्ता मिळावी, यासाठी तयार केलेल्या जाहीरनाम्याचे प्रकाशन मंगळवारी करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रामुख्याने कंधार, लोहा, देगलूर, बिलोली आणि कुंडलवाडी इत्यादी नगर पालिकांकडे आपले लक्ष केंद्रित केले असले, तरी या पक्षाने लोकांसमोर आपला जाहीरनामा आणलेला नाही. प्रत्येक नगर परिषदेतील उमेदवार घरोघरी जाऊन मतदारांना भेटण्यावर भर देत आहेत.

काँग्रेस पक्षाने कंधार, देगलूर, हिमायतनगर, किनवट, मुदखेड व भोकर इत्यादी नगरपालिकांत आपल्या उमेदवारांसाठी जोर लावला असला, तरी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा एक धावता दौरा वगळता या पक्षाच्या उमेदवारांसाठी राज्य पातळीवरील एकही प्रमुख नेता फिरकलेला नाही. खा.शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस तसेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने १३ पालिकांमध्ये नेमके किती उमेदवार उभे केले, हे या पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी जाहीर केलेच नाही.