राज्यात महाविकासआघाडी सरकारचं अर्थात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार आल्यापासून भाजपाकडून सातत्याने सरकार पडण्याचे मुहूर्त जाहीर केले जात आहेत. त्यापाठोपाठ, राष्ट्रवादी काँग्रेस राज्य सरकारची साथ सोडून भाजपासोबत जाईल, अशा देखील चर्चा मोठ्या प्रमाणावर करण्यात आल्या. सत्तास्थापनेआधी अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांसोबत हातमिळवणी करून स्थापन चालवलेल्या ८० दिवसांच्या सरकारमुळे देखील या चर्चांमध्ये तेलच ओतलं गेलं. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भाजपा आणि राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचं भाकित केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवाब मलिक यांची पत्रकार परिषद म्हणजे…

अंजली दमानिया यांनी आपल्या ट्वीटमध्ये नवाब मलिक यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचा संदर्भ दिला आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन राज्यपाल भगतसिंग कोश्याी यांच्यावर टीका केली होती. याविषयी अंदली दमानिया ट्वीटमध्ये म्हणतात, “राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा एकत्र येणार यात काहीच शंका नाही. जसं लष्करी हल्ला किंवा माघार घेताना कव्हर फायर देतात, तोच प्रकार आपण आज पाहिला. नवाब मलिक यांची पत्रकार परिषद फक्त पवार-शाह भेटीला कव्हर-अप करण्यासाठी होती. बहुतेक ठाकरेंना दाखवायला की आम्ही भाजपाविरुद्धच आहोत”.

 

अंजली दमानिया यांच्या या ट्वीटनंतर पुन्हा एकदा भाजपा-राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. शरद पवार आज दिल्लीमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. या भेटीवरून बरेच राजकीय तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले आहेत.

 

“महाराष्ट्राचं वाटोळं आता…”, शरद पवार-नरेंद्र मोदी भेटीवर अंजली दमानियांची प्रतिक्रिया!

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर देखील अंजली दमानिया यांनी ट्वीट केलं होतं. यामध्ये “१५ जुलैला फडणवीस आणि भुजबळ भेटतात (निरोप घेऊन?), १६ जुलैला फडणवीस दिल्लीला जातात, १७ जुलैला शरद पवार दिल्लीला जाऊन मोदींना भेटतात. महाराष्ट्राच्या राजकारणाचं वाटोळं आता बघवत नाही”, असं त्या म्हणाल्या होत्या. त्यावेळी देखील त्यांच्या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती.

नवाब मलिक पत्रकार परिषदेत म्हणाले…

”राज्यपालांशी संबंधित हा विषय आज कॅबिनेटमध्ये चर्चेला आल्यानंतर कॅबिनेटने नाराजी व्यक्त केली. मुख्य सचिवांना सांगण्यात आलेलं आहे की आपण स्वत: जाऊन, राज्यपालांच्या सचिवांना याबाबत अवगत करावं, की हे जे कार्यक्रम आहेत ते राज्य सरकारचे अधिकार आहेत, तुम्ही दुसरं सत्ता केंद्र असल्यासारखं वागत आहात हे योग्य नाही. कॅबिनेटची बैठक संपल्यानंतर राज्याचे मुख्य सचिव हे राजभवनात जाऊन राज्यपालांच्या सचिवाशी भेटत आहेत आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने जो संदेश देण्यासाठी सांगितले आणि जी काही आज चर्चा झाली त्याची माहिती त्यांना देणार आहेत. हे पहिल्यांदा घडत नाही, करोना काळातही हे करोना परिस्थितिचा आढावा घेत होते. याबाबत केंद्रात तक्रार झाल्यानंतर ते थांबले आणि पुन्हा या पद्धतीने त्यांनी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, हे योग्य नाही. राज्य सरकार याबाबत नाराजी व्यक्त करते, कॅबिनेटने याचा विरोध केलेला आहे”, असं नवाब मलिक आज पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar amit shah meet anjali damania targets nawab malik pc while stating bjp ncp will sure come together pmw
First published on: 03-08-2021 at 16:26 IST