देशभरात आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. सर्वच राजकीय पक्ष वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये मोर्चेबांधणी करू लागले आहेत. महाराष्ट्रातही महाविकास आघाडीच्या सातत्याने बैठका होत आहेत. या बैठकांमध्ये जागावाटपावर चर्चा केली जात आहे. महाविकास आघाडीतल्या प्रमुख नेत्यानी याबाबत सांगितलं आहे की, जागावाटप जवळपास निश्चित झालं आहे. काही मोजक्या जागांचा निर्णय होणं बाकी आहे. महाविकास आघाडी लवकरच त्यांचा जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर करेल. अशातच महाविकास आघाडीत कोल्हापूरचे शाहू छत्रपती हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर कोल्हापूरमधून लोकसभा निवडणूक लढवतील, अशी चर्चा गेल्या काही महिन्यांपासून ऐकायला मिळत आहे. कोल्हापूरच्या राजकारणात लोकसभेचे उमेदवार म्हणून शाहू छत्रपतींच्या नावाची चर्चा आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज शाहू छत्रपतींची भेट घेतली. ही भेट राजकीय असावी असं बोललं जात आहे.

कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांनी शाहू छत्रपती यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी शरद पवारांना पत्रकारांनी विचारलं की, ही राजकीय भेट होती का? शाहू छत्रपतींना राष्ट्रवादीकडून लोकसभेची उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे, या चर्चेत तथ्य आहे का? यावर शरद पवार म्हणाले, इतक्या लवकर चर्चा सुरू झाली का? मी इतकी वर्षे शाहू छत्रपतींना भेटतोय, परंतु ते मला कधी निवडणूक लढवण्याबद्दल बोलले नाहीत. तसेच तुम्ही सर्व माध्यमं जी चर्चा करत आहात त्यावर मी बोलू शकत नाही. कारण महाविकास आघाडीत मी एकटा नाही. आम्ही तीन पक्ष एकत्र आहोत. त्यामुळे असे निर्णय आम्ही तिन्ही पक्षांमधील सर्व प्रमुख नेते मिळून घेतो.

हे ही वाचा >> मराठा आरक्षण विधेयकावर शरद पवारांची सूचक प्रतिक्रिया; म्हणाले, “आधीचा मसुदा जसाच्या तसा घेतल्याने…”

शरद पवार म्हणाले, महाविकास आघाडीत काँग्रेस, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) आहे. त्यामुळे लोकसभेच्या जागांच्या संदर्भातला निर्णय आम्ही एकत्र बसून घेऊ. महाविकास आघाडीतल्या सहकाऱ्यांशी बोलूनच आम्ही महत्त्वाच्या गोष्टी ठरवतो. मी या विषयावर माझ्या पक्षातील सहकाऱ्यांशीदेखील चर्चा केली नाही. परंतु, तुम्ही व्यक्तीगत मला विचारलंत तर मला आनंदच होईल. शाहू छत्रपती कोल्हापूरचे खासदार झाले तर मला आनंदच होईल. परंतु, शाहू महाराजांचा प्रत्यक्ष राजकारणात फारसा सहभाग नसतो. सामाजिक कामात त्यांचा सहभाग असतो.