scorecardresearch

“महाराष्ट्रामधील वातावरण खराब करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर…”; मुंबईतील इफ्तार पार्टीत शरद पवारांचं वक्तव्य

मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने बुधवारी इस्लाम जिमखाना येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

Sharad Pawar in Iftaar Party
मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेली इफ्तार पार्टी (फोटो ट्विटरवरुन साभार)

राज्यामधील राजकारण सध्या मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसा या दोन मुद्द्यांवरुन चांगलेच तापले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंगे काढून टाकण्याची मागणी करत ३ मे पर्यंतचा अल्टीमेट राज्य सरकारला दिलाय. त्यापूर्वी औरंगाबामध्ये १ मे राज ठाकरे जाहीर सभा घेणार आहेत. मात्र या सभेला अद्याप परवानगी मिळाली नसल्याने आणि मनसेच्या भूमिकेला भारतीय जनता पार्टीने पाठिंबा दर्शवल्याने धार्मिक मुद्द्यावरुन राजाकारण तापलं आहे. असं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील या धार्मिक विषयावरुन सुरु असणाऱ्या वादावर भाष्य केलं आहे. मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने बुधवारी इस्लाम जिमखाना येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना राज्यासह देशभरातील परिस्थितीबाबत शरद पवार यांनी भाष्य केले.

दिल्लीत सरकार केजरीवालांचं कायदा आणि सुव्यवस्था मात्र केंद्राकडे…
“देशाच्या राजधानीत दिल्लीत एक प्रकारचे वेगळे वातावरण निर्माण केले जात आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे असले तरी कायदा व सुव्यवस्था केंद्र सरकारकडे आहे. दिल्लीत हल्ले झाले. देशातील वातावरण बिघडवण्याचे काम झाले आहे. आपापसातील बंधुभाव कमी करण्याचे वक्तव्य करणे योग्य नाही. वातावरण खराब करण्याचा प्रयत्न होत आहे,” असं पवार यांनी आपल्या भाषणामध्ये दिल्लीचा संदर्भ देत म्हटलं. पुढे बोलताना, “राज्यातील जनता ज्याप्रकारे सर्वधर्मसमभाव मानते त्यामध्ये हिंदू असो की मुसलमान, ख्रिश्चन असो या सर्वांनी आपापसातील बंधुभाव  टिकवण्यासाठी प्रयत्न करायला हवे” असं पवार यांनी महाराष्ट्रातील परिस्थितीबद्दल बोलताना म्हटलंय.

महाराष्ट्रातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास…
दिल्लीचा संदर्भ दिल्यानंतर पवार यांनी थेट महाराष्ट्रामधील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर तो हाणून पाडला पाहिजे अशा अर्थाचं वक्तव्य केलं. “महाराष्ट्रामध्येही जर कोणी सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत असेल तर सर्वांनी एकत्र येऊ हे प्रयत्न अयशस्वी होतील हे पाहिलं पाहिजे,” असं शरद पवार भाषणादरम्यान म्हणाले.

इफ्तार पार्टी होतेय याचा आनंद…
“मला आनंद आहे की आज इफ्तार पार्टी होत आहे. गेली दोन वर्षे जगात करोनाचे सावट आले होते. त्यामुळे उत्सव साजरा करायला मिळाला नाही. लग्न समारंभही साजरे करायला मिळाले नाही. आज करोना समस्या कमी झाली आहे. इफ्तार पार्टीच्या माध्यमातून रोजा इफ्तार स्वीकारला आहे,” असेही शरद पवार म्हणाले. शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न आपल्याकडून केला जातोय त्याबद्दल शरद पवार यांनी सर्वांना धन्यवाद दिले.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “हम सब एक है”
खासदार सुप्रिया सुळे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. त्यांनी, “देशात आज जे वातावरण आहे, जे चुकीचे घडत आहे त्याला रोखायला हवे. ‘हम सब एक है’ हा संदेश देत सर्वप्रथम आपण सर्व भारतीय आहोत ही भावना प्रत्येकाने बाळगायला हवी,” असे आवाहन केले.

गृहमंत्र्यांचीही उपस्थिती
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटीलही या इफ्तार पार्टीला उपस्थित होते. “काही लोक आपल्या दरम्यान असलेला बंधुभाव बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न सरकार करेल. सर्व लोकांनी शांतता कायम ठेवावी,” असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sharad pawar appeal to foil attempt of creating disharmony in maharashtra scsg

ताज्या बातम्या