राज्यात काही महिन्यांमध्ये विधानसभेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मतदारसंघात पुन्हा एकदा दौरे सुरू केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार बारामतीमधील विविध गावांमध्ये शेतकऱ्यांचे मेळावे घेत आहेत. आज त्यांनी बारामतीमधील काटेवाडी गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत संदर्भात आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीबाबत भाष्य केलं. तसेच जिल्ह्यातील कारखान्यांच्या निवडणुकीबद्दलही त्यांनी सूचक विधान केलं. “आपल्याला बदल करायचा असून जिथं मलिदा गँग असेल तिथे त्यांना त्यांची जागा दाखवली जाईल”, असं सूचक विधान शरद पवारांनी काटेवाडीत बोलताना केलं.

शरद पवार काय म्हणाले?

“आपल्याला काही गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. येथील कारखाना सुरू करण्यासंदर्भात अनेकांचा हातभार होता. आप्पासाहेबांचं मोठं योगदान होतं. कारखानदारी चांगली चालली होती. पण आता काय झालं? मला माहिती नाही. आता कोण मार्गदर्शन करतं याच्या खोलात जावं लागेल. आता गप्प बसायचं का? मी तुम्हाला सांगतो. कालची निवडणूक झाली ती देशाची निवडणूक होती. आता येथील कारखान्याची निवडणूक ही तुमच्या संसाराची निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीत लक्ष घालावं लागेल. या निवडणुकीत लक्ष घालून येथील परिस्थिती कशी बदलेल हे पाहावं लागेल”, असं शरद पवार म्हणाले.

हेही वाचा : “ही निवडणूक सोपी नव्हती, पण बारामतीकर कधी…”, शरद पवारांचा मोदींना टोला; म्हणाले, “त्यांना त्याचा चमत्कार…”

“काही नेते मंडळींनी कारखानदारी आपल्या हातात ठेवली. माणसं बसवली, मला एवढं कळतं की दुसऱ्या कारखान्याऐवजी येथील कारखान्यामध्ये एक हजार रुपये कमी मिळतात. याचा अर्थ तुमच्या संसारात तुम्ही कष्टाने उभं केलेलं दुसरं कोणीतरी घेतं. त्यामुळे हे दुरुस्त करावं लागणार आहे. हे दुरुस्त करण्यासाठी येथील निवडणुकीत लक्ष घालावं लागेल. एक काळ असा होता की, छत्रपती कारखाना हा एक नंबरचा कारखाना होता. आज कारखान्याचा एक नंबर कुठं गेला कळत नाही. आपल्याला ही दुरुस्ती करायची असेल तर एकत्र राहावं लागेल. उद्या आणखी निवडणुका येतील. लोकसभेची निवडणूक झाली, आता विधानसभेची निवडणूक येईल. समाजकारण करायचं, या पद्धतीचं राजकारण करण्याचं सूत्र ठेवायचं”, असं शरद पवार म्हणाले.

शरद पवार पुठं म्हणाले, “आधी बारामती तालुक्यात गेलो की अनेक ठिकाणी नेते दिसायचे. पण आता गेलं की सामान्य माणसांची गर्दी दिसते. आता नेते कुठं गेले कळत नाही. मलिदा गँग बाजूला झाली असं हे म्हणतात. आपल्याला लोकांच्या जीवनात बदल करायचा आहे. त्यासाठी तडजोड करायची नाही. जे काही असेल ते कष्टाने मिळवायचं. इथं मलिदा गँग बाजूला झाली असं म्हणतात. पण जिथं मलिदा गँग असेल तिथे त्यांची जागा दाखवू. आपल्याला चित्र बदलायचं आहे, त्यामुळे कुठलीही निवडणूक आली तरी जागरुक राहा. माझा प्रयत्न आहे की महाराष्ट्रात सत्ता बदल करायचा”, असं शरद पवार म्हणाले.