Sharad Pawar On NCP Merger : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामतीमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेत अकाली निधन झालं. अजित पवारांच्या निधनानंतर सर्वच क्षेत्रातच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
यातच आज शरद पवार यांनी एक मोठा गौप्यस्पोट केला आहे. ‘१२ तारखेला दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा निर्णय जाहीर करण्यात येणार होता’, असं शरद पवारांनी म्हटलं आहे. दरम्यान, जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या, तर मग दोन्ही राष्ट्रवादी पक्ष महायुतीबरोबर जाणार होते का? यावर शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.
शरद पवार काय म्हणाले?
आज झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी शरद पवार यांना प्रश्न विचारला की, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या, तर मग दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र आले असते तर तुम्ही भाजपाबरोबर म्हणजे महायुतीबरोबर जाणार होतात का? या प्रश्नावर बोलताना शरद पवार म्हणाले की, “यात भाजपाचा काय संबंध? आमची जी चर्चा सुरू होती, त्यात असा कुठला प्रश्न चर्चेत नव्हता.”
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत शरद पवारांची प्रतिक्रिया
राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार होते, आता त्याचे पुढे काय होणार? असा एक प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “आमच्या आणि अजित पवारांच्या पक्षाने एकत्र काम करण्यासंबंधी एकमत झाले होते. यासाठी अनेक बैठका झाल्या. १२ तारखेला यासंबंधी निर्णय जाहीर करायचा होता आणि ही तारीख अजित पवारांनीच दिली होती. मात्र दुर्दैवाने हा अपघात झाला.” अजित पवार चार महिन्यांपासून या प्रक्रियेसाठी प्रयत्नशील होते, असेही शरद पवार म्हणाले.
शरद पवार पुढे म्हणाले, “चार महिन्यांपासून अजित पवार आणि जयंत पाटील हे दोन्ही पक्षाच्या विलीनीकरणाची चर्चा करत होते. मात्र मधेच ही दुर्दैवी घटना घडली. आता ही चर्चेची प्रक्रिया थांबेल असे दिसते.” सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाची सुत्रे आणि उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्याच्या हालचालीवरून दोन्ही गटाच्या एकत्रीकरणाला अडथळा निर्माण होऊ शकतो, असे पवार यांनी सूचित केल्याचे दिसते.
सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीवर शरद पवारांची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, यावर तुमची प्रतिक्रिया काय? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, “सुनेत्रा पवार यांच्याबरोबर माझी त्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. ज्या चर्चा मी ऐकतोय, त्या मुंबईत सुरू आहेत, मी येथे (बारामतीत) आहे. मुंबईत प्रफुल पटेल, सुनील तटकरे हे पक्षाचे प्रमुख आहेत, तो त्यांचा अधिकार आहे. आता प्राधान्याने काय करावं हे त्यांनी ठरवलेलं दिसत आहे. त्यांच्या आधी-मधी मी भाष्य करणार नाही”, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

