पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी २ ऑक्टोबरपासून आंदोलन सुरू केलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधील गोंधळ, पेपरफुटी, रखडलेल्या भरती प्रक्रिया आणि एमपीएससी आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा अशा विविध मुद्यांवरून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनाला आज तीन दिवस झाले आहेत. मात्र, अद्यापही राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्याबाबत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे.
एमपीएससीच्या या विद्यार्थ्यांचं हे ‘सत्याग्रह आंदोलन’ राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात सुरू आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या काही प्रतिनिधींनी आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी शरद पवारांनी विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा केली.
यावेळी विद्यार्थ्यांच्या मागण्यासंदर्भात शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून संपर्क साधला आणि विद्यार्थ्यांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांना सांगितल्या. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची तातडीने दखल घेऊन त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याचं आवाहन शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलं आहे. ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधावा आणि त्यांच्या मागण्यांचा विचार करावा. विद्यार्थ्यांना न्याय देण्याची सरकारची नैतिक जबाबदारी आहे’, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
शरद पवार काय म्हणाले?
“माझ्याकडे विद्यार्थ्यांचे काही प्रतिनिधी आले होते. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत आणि त्यांच्या मागण्याबाबत मार्ग निघायला हवा. सुसंवाद असायला हवा. एका बाजूने राज्याचे मुख्यमंत्री किंवा त्यांचे सहकारी आणि दुसऱ्या बाजूने विद्यार्थ्यांचे काही प्रतिनिधी यांच्यात चर्चा व्हावी. मात्र, जर चर्चा झाली नाही तर प्रश्न सुटणार नाहीत. कोणताही प्रश्न सुटायचा असेल तर सुसंवाद असायला हवा”, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
‘मी मुख्यमंत्री फडणवीसांना फोन केला’ : शरद पवार
“विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन मार्ग काढला जावा, यासाठी मी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. मात्र, देवेंद्र फडणवीस हे आज मुंबईत नाहीत, ते नागपूरला आहेत. ते बहुतेक उद्या सकाळी मुंबईला येतील. मुख्यमंत्री फडणवीसांना मी विनंती केली की, तुम्ही मुंबईत आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे तातडीने लक्ष घाला. विद्यार्थ्यांशी संवाद साधा. जर आवश्यकता असेल तर तुम्ही आणि विद्यार्थ्यांचे काही प्रतिनिधी चर्चा करा. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी जे शक्य आहे ते सर्व करण्याचं आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुचवलं. आता ते उद्या मुंबईत आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत भूमिका मांडतील. विद्यार्थ्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे”, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.
