Sharad Pawar on NCP Merger : पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चा जोरात सुरू झाल्या होत्या. मात्र, अजित पवार यांच्या निधनानंतर या चर्चा थांबल्या. दोन्ही पक्षांकडून विलीनीकरणाबाबत संदिग्ध प्रतिक्रिया येऊ लागल्या. त्यामुळे विलीनीकरणाची चर्चा झाली होती की नाही यावर अद्याप खुलासा आलेला नाही. दरम्यान, यावर आता खुद्द शरद पवारांनीच मौन सोडलं आहे. आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली.

पवार कुटुंबावर दुःख

“राजकारणात लोकांचं काम करण्यासाठी यावं लागतं. अजित पवार हे लोकांचं काम करण्यासाठी सक्रिय होते. अजित पवारांबद्दल नागरिकांमध्ये आदर होता. दुर्दैवाने त्यांचं अपघाती निधन झालं. कुटुंब म्हणून आम्हाला त्याचं दुःख आहे. पवार कुटुंबावर संकट आलेलं आहे. मी कुटुंबप्रमुख आहे. त्यामुळे कुटुंबप्रमुख म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे”, असं शरद पवार म्हणाले.

विलीनीकरणासंदर्भात अजित पवार-जयंत पाटलांमध्ये बैठका

विलीनीकरणाबाबत शरद पवार म्हणाले, “विलीनीकरणाबाबत जयंत पाटील आणि अजित पवार चर्चा करत होते. परंतु, अजित पवारांच्या मृत्यूनंतर ही चर्चा थांबली. आमच्या पक्थात आता याविषयी चर्चा नाही. विलीनीकरणासंदर्भात अजित पवारांबरोबर जयंत पाटलांच्या पाच-सहा बैठका झाल्या होत्या. बैठक झाल्यानंतर दोघांपैकी एक येऊन मला ब्रिफिंग करत होते.”

ते पुढे म्हणाले, “भविष्यात ही प्रक्रिया पुढे जाऊ शकते की नाही हे आज सांगता येणार नाही. अजित पवारांचा दृष्टीकोन आम्हाला समाधान देणारा होता. परंतु, ते गेल्यामुळे कंटिन्यू राहिलं नाही.”

उमेदवार देण्याचा काँग्रेसला अधिकार

“काँग्रेस एक राजकीय पक्ष आहे, त्यामुळे निर्णय घेण्याचा त्यांना अधिकार आहे. त्यामुळे त्याबाबत जास्त चर्चा करण्याची गरज नाही. तसेच बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होऊद्या अशी मागणी करण्याचंही काही कारण नाही. लोकशाहीमध्ये निवडणूक लढवायची असेल तर समोर कोणीतरी उमेदवार असेल हे मान्य करूनच निवडणूक लढवावी लागत असते”, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार का?

सुनेत्रा पवार यांना तुम्ही पाठिंबा दिला आहे. पण आता त्यांचा प्रचार तुम्ही आणि सुप्रिया सुळे करणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, “आम्ही त्यांच्या विरोधात उमेदवार उभा केलेला नाही.”