संकटाच्या काळात जनतेच्या पाठीशी उभे राहण्याबाबत धोरण तयार करण्याची जबाबदारी शासनाची असते. पण शेतकऱ्यांच्या मदतीस राज्य धावून आल्याचे दिसत नसल्याने पक्ष आंदोलन उभारणार आहे. विधानसभा चालू देणार नाही, राज्य चालू देणार नाही, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी ११ डिसेंबरच्या मोर्चाचे स्वरूप स्पष्ट करताना केली.

जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे  यमुना लॉनमध्ये शनिवारी दुपारी कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला. मेळाव्यात बोलताना पवार यांनी राज्य व केंद्र शासनावर टीकास्त्र सोडले. केंद्र व राज्य सरकारने एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही, असे प्रारंभीच स्पष्ट करीत पवार म्हणाले, राज्यातील सर्वच भागात मी फिरत आहे.

समाजातील सर्व घटकांशी संवाद साधत आहे. या पाहणीत एकही घटक समाधानी असल्याचे मला दिसत नाही. नाना प्रश्न लोक मांडतात. मला ते सोडविण्याचा अधिकार नाही. पण ते योग्य ठिकाणी मांडण्याचे काम मी करणार आहे. केंद्राच्या धोरणामुळे सर्वाधिक रोजगार देणाऱ्या बांधकाम व आयटी क्षेत्रावर अवकळा आली आहे. दोन्ही मिळून ४० हजार नोकऱ्यांवर गदा आली. त्याचे उत्तर सरकारजवळ नाही. संसदेच्या अधिवेशनात मी प्रश्न मांडणार आहे. ‘तीन वर्षांत कुठे आणून टाकला हा महाराष्ट्र’, असा प्रश्नविचारण्याची वेळ आली आहे.

यवतमाळात ७० टक्के शेती उद्ध्वस्त झाली. पण सरकार ढुंकून पाहायला तयार नाही. राज्य मदतीला धावून आल्याचे दिसत नाही. शेतमालाला वालीच नाही. जीएसटी लागू करणाऱ्या सरकाराबद्दल जनतेत नाराजीचे वातावरण आहे. कार्यकर्त्यांनी हे ओळखून संघर्षांसाठी तयार व्हावे. ११ डिसेंबरपासून आंदोलन सुरू करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. त्यात सहभागी होऊन सरकारला जागे करा, असे आवाहन खा. पवार यांनी केले.

मेळावा आयोजक माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख यांनी विदर्भ हा लाटेवर चालणारा प्रदेश असून कार्यकत्यार्ंनी शेतकऱ्यांचे हीत ओळखणाऱ्या शरद पवारांची लाट तयार करावी, असे आवाहन केले. माजी मंत्री अनिल देशमुख, माजी आमदार ख्वाजा बेग, समीर देशमुख यांचीही भाषणे झालीत.

व्यासपीठावर माजी मंत्री वसुधाताई देशमुख, माजी आमदार संदीप बाजोरिया, वसंतराव कार्लेकर, अ‍ॅड. सुधीर कोठारी यांची उपस्थिती हाती. पवारांच्या भाषणादरम्यान भाजपने निवडणुकीवेळी दिलेल्या आश्वासनाची चित्रफित दाखवित खिल्ली उडविण्यात आली. जिल्हाध्यक्ष सुनील राऊत यांनी प्रस्ताविक केले.

पवार – पाटील भेट

खासदार शरद पवार हे विश्रामगृहावर मुक्कामी असतांनाच राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील हे शनिवारी वर्धा दौऱ्यावर असल्याने याच ठिकाणी मुक्कामाला होते. सकाळी ७ वाजता खासदार रामदास तडस यांनी पवारांचे स्वागत केले. त्याचवेळी पाटील हे पवारांना भेटण्यासाठी आले. त्यांनी एकटय़ाने पवारांशी संवाद साधला. २० मिनिटे ही भेट चालली. या दोन नेत्यात झालेल्या चर्चेचे रहस्य मात्र उलगडले नाही.

संवादासाठी दौरा

शरद पवारांच्या दौऱ्यांचे प्रयोजन काय? असे वृत्त शुक्रवारच्या लोकसत्तात प्रकाशित झाले होते. त्याची नोंद घेत खा. पवार म्हणाले, ‘लोकसत्ता’च्या पत्रकाराने दौऱ्याचे कारण उपस्थित केले. पत्रकार त्यांच्यापरीने निष्कर्ष काढतात. तसे काढायला ते मोठेच असतात. पण आमचा उद्देश लोकांशी संवाद साधण्याचा, संघटना बांधण्याचा, कार्यकर्त्यांत ऊर्जा निर्माण करण्याचा असतो. ते मी करतो. भाजप-सेनेचा काडीमोड झाला तरीही आम्ही त्यांच्यासोबत जाणार नाही, असे ते म्हणाले.

तिमांडेची कुचंबणा

माजी आमदार राजू तिमांडे यांनी भाषणाची सुरुवात ‘आदरणीय दत्ताजी..’ अशी करताच पवारांसह सगळेच हास्यात बुडाले. तिमांडे थोडय़ाच वेळेत सावरले. अनिल देशमुखांनी भाषणाची सुरुवात करताना तिमांडेचा संदर्भ देत टिप्पणी केली की ‘जिथे सत्ता तिथे..’ असा टोला दत्ता मेघेंचे नाव न घेता लगावला. भाषणादरम्यानच हात उंचावल्यावर देशमुखांच्या खांदय़ाचे हाड सरकले. दोन तीन मिनिटे ते जागेवरच हात धरून अस्वस्थ झाल्याने व्यासपीठावर चिंतेचा सूर उमटला. यावेळी उपस्थित डॉ. दिलीप धांदे व अन्य नेत्यांनी देशमुखांना पकडून व्यासपीठाखाली नेले. तिथे हाताचा विशिष्ट व्यायाम केल्यावर देशमुखांचा निखळलेला सांधा परत जुळला. परत व्यासपीठावर पोहचलेल्या देशमुखांचे पवारांनी स्वागत केले. या घटनेने मेळाव्यावर काही क्षण अनिश्चिततेचे सावट पसरले होते.

दिंडी नव्हे ‘हल्ला बोल’

खासदार पवार यांनी ११ डिसेंबरच्या आंदोलनाचे ‘कापूस दिंडी’ हे नाव  बदलण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. आता ‘हल्ला बोल’ म्हणून ही यात्रा निघणार आहे. दिंडी ही वारकऱ्यांची विठ्ठलाच्या दर्शनासाठी असते. पण आम्ही ज्यांना भेटायला चाललो, तिथे विठ्ठल नाही तर खवीस बसला आहे. म्हणून त्याच्यावर हल्लाबोल करणार, असे म्हणताच एकच हशा उडाला.