महाराष्ट्रात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेनेने युतीत राहून निवडणूक लढवली. मात्र, निकालानंतर सरकार स्थापनेच्यावेळी शिवसेना आणि भाजपात काडीमोड झाला. यामागे अनेक राजकीय घडामोडी घडल्या. आतापर्यंत या सर्वच घटनांवर केवळ अंदाजच वर्तवण्यात आले. मात्र, आता स्वतः महाविकासआघाडी सरकारचे निर्माते ठरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच या घडामोडींवरील पडदा हटवला आहे. निकालानंतर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्यापासून ते सेना-भाजपातील अंतर वाढवण्यापासून केलेल्या वक्तव्यांपर्यंत त्यांनी भाष्य केलं आहे. पवारांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त ‘लोकसत्ता’तर्फे ‘अष्टावधानी ’ या विशेष पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्या आयोजित करण्यात आला होता. यावेळी लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शरद पवार म्हणाले, “तेव्हा स्पष्ट बहुमत कुणाकडेच नव्हतं. आघाडी म्हणून बघितलं तर सेना-भाजपाकडे बहुमत होतं. मात्र, सेना आणि भाजपा एकत्र राहणार नाही हे आम्हाला दिसलं. महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला आत्ता जे सत्तेत येऊ पाहत आहेत त्यांना बाजूला करायचं असेन तर त्यांना सोयीची भूमिका घेणं शक्य नाही. म्हणून पहिल्यांदा निवडणूक झाल्यावर मी दिल्लीत एक वक्तव्य केलं, देवेंद्र फडणवीस यांना बहुमतासाठी काही लोकांची कमतरता असेन तर आम्ही त्याचा गांभीर्याने विचार करू. माझं ते एक वक्तव्य सेना-भाजपातील अंतर वाढायला फार उपयोगी पडलं.”

“…तर आम्ही पुन्हा ५ वर्षे सत्तेबाहेर राहिलो असतो”

“साधी गोष्ट आहे की ते दोघे एकत्र यावं असा प्रयत्न आम्ही केला असता, तर आम्ही पुन्हा ५ वर्षे सत्तेबाहेर राहिलो असतो. त्यामुळे शिवसेनेत अस्वस्थता आहे हे दिसत होतं आणि ते तातडीने मुख्यमंत्रीपद हवंय म्हणत होते. त्यामुळे तेव्हा तात्पुरतं त्यांना पोषक वक्तव्य केल्यानं नुकसान होणार नव्हतं. माझ्या या एका वक्तव्यामुळे सेनेत अस्वस्थता निर्माण झाली आणि फडणवीसांकडून असं काही सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे ते आमच्यासोबत आले,” असं शरद पवार यांनी सांगितलं.

“माझी व पंतप्रधान मोदींची महाराष्ट्रात राष्ट्रवादी-भाजपाने एकत्र येण्यावर चर्चा झाली होती”

पवार पुढे म्हणाले, “हे खरं आहे की माझी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि भाजपाने एकत्र येण्याबाबत चर्चा झाली. मोदींची तशी इच्छा होती, पण मी स्वतः त्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना सांगितलं की, हे शक्य होणार नाही, आम्हाला तुम्हाला अंधारात ठेवायचं नाही, आपली भूमिका वेगळी आहे. यावर त्यांनी अजूनही विचार करा असं सांगितलं. निवडणुकीनंतर दीड महिने सरकार स्थापन झालं नव्हतं त्यामुळे सेना-भाजपात खूप अंतर वाढलं होतं. त्यामुळे त्यांना महाराष्ट्रात स्थिर सरकार आणण्यासाठी राष्ट्रवादीची गरज वाटली असेन.”

हेही वाचा : यूपीएचं सरकार असताना शरद पवार आणि मनमोहन सिंगांमुळेच मोदींवरची कारवाई टळली? पवारांनी केला खुलासा!

“राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या अंतर्गत जेव्हा बैठका झाल्या तेव्हा या दोन्ही पक्षांच्या काही सहकाऱ्यांमध्ये कटुता वाढली होती. त्यामुळे या परिस्थितीचा फायदा घेणं शक्य आहे हा विचार भाजपाच्या नेतृत्वाच्या मनात असू शकतो. त्यामुळे त्यांनी चाचपून पाहिलं असावं,” असंही शरद पवार यांनी नमूद केलं.

“मी अजित पवार यांना पाठवलं असतं तर त्यांनी अर्धवट काम केलं नसतं”

शरद पवार म्हणाले, “२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर मीच अजित पवार यांना देवेंद्र फडणवीस आणि भाजपासोबत पाठवलं अशी चर्चा असते हे खरं आहे. पण मी त्यांना पाठवलं असतं तर त्यांनी राज्यच बनवलं असतं. त्यांनी अर्धवट काही काम केलं नसतं. मी अजित पवार यांना पाठवलं होतं यात काहीच अर्थ नाही. तेव्हा तसं होण्यामागे प्रमुख २ कारणं होती.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar comment on how he devide bjp and shivsena after assembly election result pbs
First published on: 29-12-2021 at 23:47 IST