कराड : सध्या देशात राजकीय अराजकता माजली असून पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींचा कालखंड देशासाठी हानिकारक ठरला असल्याने त्यांना देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार  नाही, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी चढवला. खासदार उदयनराजे भोसले यांच्या स्टाईलमध्ये शर्टाची कॉलर उडवून पवारांनी राजेंची खिल्ली उडविली.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अर्थात ‘महाविकास आघाडी’चे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ पाटणमध्ये जाहीर सभेत ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, माजीमंत्री विक्रमसिंह पाटणकर, उमेदवार आमदार शशिकांत शिंदे, आमदार अरुण लाड, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम, श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.

हेही वाचा >>>विठ्ठल कारखान्यावर शिखर बँकेची कारवाई ,अभिजित पाटलांना धक्का, साखर गोदामांना टाळे

केंद्र व राज्य सरकार मतलबी

पवार म्हणाले, नरेंद्र मोदी हे पदाची गरिमा राखू शकले नाहीत. सध्याचे केंद्र व राज्य सरकार हे मतलबी व अराजकता माजवणारे आहे. त्यामुळे ही निवडणूक प्रामुख्याने प्रचंड महागाई, बेरोजगारी, जातीयवाद या मुद्द्यांवर होत असल्याने सर्वसामान्य मतदारांनी या परिस्थितीचा अतिशय गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

आजच्या या महागाईत महिला घर तर सर्वसामान्य जनता वाहने चालवू शकत नाहीत. सन २०१४ च्या तुलनेत आज प्रचंड महागाई वाढली आहे. देशातील ८७ टक्के तरुण बेरोजगार आहेत. जातीयवाद, धार्मिकता यावरच आज हा देश चालवला जात आहे. आजचे पंतप्रधान राहुल गांधी, गांधी घराणे व नेहरूंच्यावर टीकाटिप्पणी करण्यात मश्गूल आहेत. ज्या माणसांनी व कुटुंबाने आपल्या स्वातंत्र्यात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली, दुर्दैवाने त्यांच्यावरच टीका, टिंगलटवाळी करणे हे या देशातल्या जनतेला कधीही मान्य होणार नाही. त्यामुळे यापुढे देश नक्की कोणाच्या हातात द्यायचा हे ठरवणारी येणारी लोकसभेची निवडणूक असल्याने निश्चितच सातारा जिल्हाच नव्हे तर राज्य व देशातही परिवर्तन अपेक्षित आहे. या अपेक्षित परिवर्तनामध्ये शशिकांत शिंदे यांच्यासारख्या एका अभ्यासू, परखड व्यक्तिमत्वाला संसदेत बहुमताने पाठवा असे आवाहन शरद पवार यांनी केले.

सर्वसामान्यांमध्ये चीड

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, सध्या केवळ पक्ष फोडणे, खोकी, ईडी, सीबीआयसारख्या संस्थांचा दबाव व आमिष दाखवण्यापलीकडे काहीच घडत नाही. सत्ताधाऱ्यांनी भलेही आमदार, नेते फोडले असलेतरी सर्वसामान्य मतदार मात्र या सर्वांची चीड बाळगून आहेत. आता राज्यघटना बदलण्याची हिंमत करणाऱ्या व लोकशाहीसाठी घातक असलेल्या विघातक वृत्तींविरुद्ध ही निवडणूक होत असल्यामुळे तुम्ही आम्ही बेसावध न राहता अत्यंत जबाबदारीने चांगल्या खासदारांना विजयी करण्यासाठी सर्वस्व समर्पित करणे गरजेचे असल्याचे आवाहन चव्हाण यांनी केले.

निकालातून गद्दारांना जागा दाखवा, मतदारसंघातून प्रचंड अपेक्षा

सध्याचे पालकमंत्री आपल्या पदाचा गैरवापर करत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या अनैतिक सरकारविरोधात आपल्याला लढायचे असेल तर पाटण मतदारसंघातून प्रचंड अपेक्षा आहेत. महाराष्ट्रातील जे नाट्यमय राजकारण सुरू आहे ते केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्याच आशीर्वादाने होत असल्याने आता गद्दारांना धडा शिकवण्यासाठी शशिकांत शिंदे यांच्यासारख्या प्रामाणिक माणसाला निवडून देणे सार्वत्रिक हिताचे ठरणार आहे. या निवडणुकीच्या निकालात गद्दारांना त्यांची जागा दाखवण्याची खरी जबाबदारी आपल्या या मतदारसंघातील सर्वसामान्य मतदाराच्या हातात आहे असेही ते म्हणाले.

निष्ठावंत कसा असावा हे आजवर विक्रमसिंह पाटणकरांनी तर शेलारमामा कसा असावा हे श्रीनिवास पाटील यांनी दाखवून दिले आहे. त्यांच्या याच तालुक्यात सत्ताधारी राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात प्रचंड जनतेचा रोष आहे. तो रोष घालवत नव्याने क्रांती करायची असेल तर माझ्यासारख्या सामान्य माथाडी व कायमच पवार साहेबांशी एकनिष्ठ असलेल्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी आपण सर्वजण प्रामाणिकपणे प्रयत्न कराल असा विश्वास शशिकांत शिंदे यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

जीव गेला तरी शरद पवारांची साथ सोडणार नाही

माझ्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून जाणीवपूर्वक कारवायातून कितीही त्रास दिला. दबाव जरी आणला. माझा जीव गेला तरी चालेल, मी पवारसाहेबांची साथ कधीही सोडणार नाही. आपल्या सत्तेचा गैरवापर करत माझ्यावर कितीही केसेस टाकल्या तरीही मी मरेपर्यंत पवारसाहेबांचा कट्टर व निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून राहीन अशी ठाम ग्वाही शशिकांत शिंदे यांनी दिली.

मोजकेच लोक देश चालवतात

डॉ . भारत पाटणकर म्हणाले हुकूमशाहीचा पराभव करत लोकशाहीचा विजय करण्यासाठीची ही निवडणूक आहे. सध्या देशात मोदी व शहांसह अदानी, अंबानीसारखी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी माणसे देश चालवत आहेत. त्यामुळेच महागाई, बेरोजगारी, अत्याचार, जातीयवाद वाढला आहे. निवडणुका आल्यावर स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न देण्याची मागणी करतात मग त्यांच्या काळात त्यांचे हात अथवा तोंड कोणी बांधले होते हा विचार करणे गरजेचे आहे. महाविकास आघाडीचा विजय हा सर्वांच्या हिताचा ठरणार असल्याचा विश्वास डॉ. पाटणकर यांनी व्यक्त केला. या वेळी बाळासाहेब पाटील, विक्रमसिंह पाटणकर, हर्षद कदम आदींची भाषणे झाली. 

यशवंतरावांची काहींना निवडणुकीतच आठवण

यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांची अवघ्या महाराष्ट्राची परंपरा आहे. पण,  काहींना त्यांची आठवण निवडणुकीतच होते असा टोला  खासदार शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना उद्देशून लगावला. यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न देण्याची त्यांची आठवण ही आनंदाची बाब असाल्याचे ते म्हणाले.

स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचे विचार व परंपरा जोपासायची असेल तर या साताऱ्यातून शशिकांत शिंदे यांनाच संसदेत पाठवा असे आवाहन शरद पवार यांनी केले. यशवंतरावांचे विचार जोपासणे हे निश्चितच आव्हानात्मक आहे आणि ते आव्हान एक सर्वसामान्य म्हणून आम्ही आतापर्यंत जोपासत आलो असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.