पत्रा चाळ प्रकरण : चौकशी करा, आरोप खोटे निघाले तर आरोप करणाऱ्यांवर काय कारवाई करणार? शरद पवारांचे आव्हान | Sharad Pawar denied allegations of bjp in patra chawl scam | Loksatta

पत्रा चाळ प्रकरणातील आरोपावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

पत्रा चाळप्रकरणी भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी केलेले आरोप शरद पवार यांनी फेटाळले आहेत.

पत्रा चाळ प्रकरणातील आरोपावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
शरद पवार (संग्रहित फोटो)

पत्रा चाळ घोटाळा प्रकरणात भाजपाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव घेतले आहे. या आरोपानंतर आता वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. असे असताना या आरोपानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत भाजपाने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ईडीचे आरोपपत्र व २००६ साली मी घेतलेल्या बैठकीचे आरोप खोटे आहेत. तरीही चौकशी करावी. चौकशीतून आरोप खोटे निघाले तर, आरोप करणाऱ्यावर काय कारवाई करणार, हे राज्य सरकारने जाहीर करावे, असे आव्हान शरद पवार यांनी केले.

शरद पवार काय म्हणाले?

पत्रा चाळप्रकरणी न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या आरोपपत्रात माझे नाव असल्याचे म्हटले जात आहे. चौकशी करणाऱ्या संस्थेने कोर्टात काय सांगितलं? तसेच तेव्हा राज्य सरकारमध्ये काय चर्चा झाली, याबाबतची कागदपत्रे उपलब्ध आहेत. त्यांचा अभ्यास केला तर सर्व गोष्टी स्पष्ट होतील. चौकशीला नाही म्हणण्याची आमची भूमिका नाही. चौकशी झाल्यानंतर हा आरोप वास्तव आणि सत्याला धरून नसेल, तर काय भूमिका घेणार, हे राज्य सरकारने जाहीर करावे, असे शरद पवार म्हणाले.

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीदेखील शरद पवार यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं. शरद पवार जेव्हापासून राज्याच्या राजकारणात आले तेव्हापासून त्यांनी आतापर्यंत १० ते २० हजार बैठका घेतल्या आहेत. राज्यात असा एकही प्रकल्प नाही, ज्यासाठी शरद पवार यांनी बैठक घेतलेली नाही. बैठका घेणं हे सरद पवार यांना नवं नाही. शरद पवार यांनी १४ ऑगस्ट २००६ रोजी एक बैठक घेतली होती. गृहनिर्माण खात्याशी संबंधित असलेले नेते या बैठकीला उपस्थित होते. पत्रा चाळचा प्रकल्प १९८८ पासून रखडलेला होता, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

शरद पवार यांच्यावरील आरोप काय ?

पत्राचाळ प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी मंगळवारी केली. त्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया देताना अप्रत्यक्षपणे या मागणीला पाठिंबा दिला आहे. जवळ जवळ १ हजार ३९ कोटींच्या पत्रा चाळ प्रकरणी अतुल भातखळकर यांनी गृहमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी शरद पवार यांचीही चौकशी केली जावी, अशी मागणी केली आहे. पवार केंद्रीय कृषीमंत्री असताना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान कार्यालयामध्ये म्हाडाच्या अधिकाऱ्यांसोबत संजय राऊतांच्या उपस्थितीत पत्रा चाळसंदर्भात बैठका झाल्या, असा आरोप अतुल भातखळकर यांनी केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-09-2022 at 13:20 IST
Next Story
Video : साताऱ्यात सज्जनगडावर बिबट्याचा वावर? बिबट्याचा बछडा दिसल्याने खळबळ!