Sharad Pawar Eknath Shinde Meeting: ज्येष्ठ नेते शरद पवारांनी बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानभवनाच्या दालनात भेट घेतली. शिंदे-पवारांच्या या भेटीवरुन महाविकास आघाडीत बिघाडीचे चित्र निर्माण झाले आहे. शिवसेना (उबाठा) नेते राज्यसभा खासदार संजय राऊतांनी या भेटीवरुन नाराजी व्यक्त करत, “अशा घटनांमुळे विश्वासार्हता कमी होते”, असे मत मांडले. तर, या भेटीवर राष्ट्रवादी (शरद पवार) चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

संजय राऊत यांनी शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर नाराजी व्यक्त केली. “शरद पवार मोठे नेते आहेत. पण, अख्खं विधानभवन ओस पडलं होतं का? समोर राष्ट्रवादी भवन आहे. वाय. बी. प्रतिष्ठान आहे. हे आमचं एका निष्ठावंत कार्यकर्त्याच मत आहे. आम्ही कधीही गद्दारांच्या ठिकाणी जाऊन आमच्या पक्षाच्या बैठका घेण्याचं एवढे आम्ही काय म्हणतात ते सहिष्णू नाही आहोत आणि एवढं आमचं मन नक्कीच मोठं नाही. आम्ही करणार सुद्धा नाही. ज्यांचा आहे त्यांनी ते करावं. पण आम्हाला ते मान्य नाही. कोणाला पटत असेल त्यांनी ते करावे. यामुळे राष्ट्रवादीची विश्वासार्हता कमी होते”, असे संजय राऊत म्हणाले.

शशिकांत शिंदेंनी स्पष्ट केली भूमिका

या भेटीवर प्रतिक्रिया देतान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी, “प्रत्येक गोष्टीकडे राजकारणाच्या भावनेतून आणि विरोधाच्या भावनेतून बघू नये,” असे मत मांडले. महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र होतो आणि आहे. पवारांची तब्येत विचारात घेता, बैठक दुसऱ्या मजल्यावर होती. या पूर्णपणे योगायोग आहे, त्यातून कोणताही संदेश देण्याचा प्रयत्न नाही. याबाबत संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाने कोणताही गैरसमज करुन घेऊ नये. ज्येष्ठ नेते म्हणून एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांचे स्वागत केले, यातही काही वेगळं पाहण्याची गरज नाही”, अशी शशिकांत शिंदे यांनी भूमिका स्पष्ट केली.

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

“आपल्याच आमदारांबरोबर चर्चा करावी म्हणून पायऱ्यांच्या जवळचे दालन कोणते आहे? आणि पवारांची प्रकृती विचारात घेता शिंदेंच्या दालनाची निवड करण्यात आली. यात कोणताही राजकीय अर्थ काढू नये. शिंदे कॅबिनेटमध्ये होते, त्यांना समजाच ते खाली आले आणि त्यांनी पवारांचे स्वागत केले आणि माघारी गेले. आमचे वैचारिक मतभेद असतील पण, ते आमचे शत्रू नाहीत”, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

उदय सामंत, योगेश कदमांची प्रतिक्रिया

दरम्यान, “शरद ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचा एकनाथ शिंदे यांनी दालनात आले असता सत्कार केला ही महाराष्ट्राची परंपरा आहे. हे काही लोक विसरले आहेत, याचा राजकीय अर्थ लावू नये”, असे मंत्री उदय सामंत म्हणाले. तर, राज्यमंत्री योगेश कदम यांनी, “येत्या काही दिवसात चांगले निर्णय होताना दिसतील, एनडीएची ताकद वाढताना दिसेल”, असे सूचक वक्तव्य केले आहे.