कर्जत : ज्येष्ठ नेते शरद पवार यांची राज्यसभेसाठी पुन्हा एकदा बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे पत्र प्रसिद्ध केले आहे. सध्या प्रकृतीच्या कारणामुळे डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिल्याने प्रत्यक्ष भेटीगाठी शक्य नसल्याचे सांगत त्यांनी पत्राद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. हे पत्र आमदार रोहित पवार यांनी समाजमाध्यमावर प्रसिद्ध केले.

शरद पवार गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. ते राज्यसभेवर जाणार का, याविषयी मोठी उत्सुकता केवळ राज्यातच नाही, तर देशामध्ये व्यक्त केली जात होती. अखेर महाविकास आघाडीकडून त्यांचे नाव निश्चित झाले आणि शरद पवार यांनी सहमती दर्शविल्यामुळे घरूनच त्यांचा अर्ज भरण्यात आला.

या निवडीनंतर शरद पवार यांनी एक पत्र लिहिले. रोहित पवार यांनी ते समाज माध्यमावर शुक्रवारी प्रसिद्ध केले. यामध्ये शरद पवार यांनी १९६७ पासून लोकप्रतिनिधी म्हणून सुरू केलेल्या प्रवासाला उजाळा दिला आहे. सन १९६७ मध्ये प्रथमच महाराष्ट्र विधानसभेवर निवडून जाण्याची संधी मिळाल्यापासून आजपर्यंत जनतेच्या विश्वासामुळेच हा राजकीय प्रवास अखंडपणे सुरू राहिल्याचे त्यांनी नमूद केले आहे. ‘या प्रदीर्घ वाटचालीत राज्यात मंत्री, मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेता अशा जबाबदाऱ्या सांभाळण्याची संधी मिळाली, तर केंद्रात संरक्षणमंत्री आणि दहा वर्षे कृषीमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली,’ असा उल्लेख पत्रात आहे.

‘या सर्व जबाबदाऱ्या पार पाडताना महाराष्ट्राच्या, तसेच देशाच्या विकासासाठी सकारात्मक काम करता आले, यामागे जनतेचा विश्वास आणि पाठिंबा हेच सर्वांत मोठे बळ राहिले. महाराष्ट्रातील जनतेने पुन्हा एकदा पुढील सहा वर्षे सेवा करण्याची संधी देऊन विश्वास दाखवला,’ असे नमूद करून पवार यांनी पत्रात राज्यातील जनतेचे आणि मित्रपक्षांचे आभार मानले आहेत.

‘महाराष्ट्राने दिलेले प्रेम, विश्वास आणि पाठबळ हेच आपल्या आयुष्याच्या ऊर्जेचे खरे स्रोत आहेत. राज्याच्या विकासासाठी आयुष्यभर काम करण्याची संधी मिळणे हे आपले भाग्य आहे,’ अशी भावना व्यक्त करून, ‘पुढील काळातही जनतेच्या अपेक्षांना न्याय देत प्रामाणिकपणे सेवा करत राहीन,’ असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे.

सध्या डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्यामुळे प्रत्यक्ष संवाद साधणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले असले, तरी महाराष्ट्राबद्दलच्या आत्मीयतेमुळे त्यांच्या दीर्घ राजकीय कारकिर्दीतील जनतेशी असलेले नाते पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक दशकांपासून सक्रिय असलेले शरद पवार आजही तितक्याच उत्साहाने सार्वजनिक जीवनात कार्यरत असल्याचे या पत्रातून स्पष्ट झाले आहे.

Live Updates