Sharad Pawar Health Update : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना काल (२२ फेब्रुवारी) पुन्हा पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या आठवड्याभरात त्यांना दुसऱ्यांदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान, त्यांच्या प्रकृतीविषयी आता रुबी रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांची प्रकृती आता सुधारली असल्यांचं त्यांनी सांगितलं.

रुबी रुग्णालयातील डॉ. परवेझ ग्रॅण्ट म्हणाले, शरद पवार यांची प्रकृती सध्या चांगली आहे. त्यांच्यावर आवश्यक ते सर्व उपचार करण्यात आले आहेत आणि सध्या ते विश्रांती घेत आहेत. कालपासून त्यांनी व्यवस्थित जेवण केले असून त्यांची प्रकृती सुधारत आहे. सर्व वैद्यकीय चाचण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत आणि त्यांचे रिपोर्ट्स समाधानकारक आहेत.”

मागच्यावेळी शरद पवार रुग्णालयात दाखल झाले होते तेव्हा त्यांना पाच दिवस रुग्णालयात ठेवण्यात आलं होतं. त्यांच्यावर पूर्ण उपचार करूनच त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. डॉक्टरांच्या या मेहनतीचं खासदार सुप्रिया सुळे यांनीही आभार मानले होते. दरम्यान, आता पुढच्या ४८ तासांत शरद पवारांना डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचं डॉक्टर ग्रॅण्ट यांनी सांगितलं. “पुढील ४८ तासांत ते घरी जाऊन पुढील उपचार घेतील. काळजी करण्यासारखे काहीही कारण नाही. त्यांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली आहे”, असं डॉ. ग्रॅण्ट यांनी सांगितलं.

४८ तासांत शरद पवारांना मिळणार डिस्चार्ज

शरद पवार बारामती येथील त्यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी होते. तेव्हा शरद पवारांना अचानक त्यांना खोकला आणि कफचा त्रास जाणवू लागला, त्यानंतर डॉक्टरांचं एक पथक घरी येऊन तपासणी करून गेले. त्यानंतर त्यांना तातडीने पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ते पाच दिवस रुबी रुग्णालयात होते. पाच दिवसांच्या उपचारानंतर त्यांची प्रकृती सुधारली होती. आता त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे.

९ फेब्रुवारी रोजी शरद पवारांना खोकल्याचा त्रास जाणवू लागल्याने डॉक्टरांचं एक पथक घरी येऊन तपासणी करून गेले. त्यानंतर त्यांना तातडीने पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ते पाच दिवस रुबी रुग्णालयात होते. पाच दिवसांच्या उपचारानंतर त्यांची प्रकृती सुधारली होती. पुन्हा २२ फेब्रुवारी रोजी त्यांना डियाड्रेशनचा त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्या आहेत. त्यामुळे पुढील ४८ तासांत ते घरी जातील, असं डॉक्टरांनी स्पष्ट केलं.