Sharad Pawar on NCP Merger: अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर पवार कुटुंबियासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला. महानगरपालिका निवडणुका होण्याच्या आधीपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू होती. पुणे आणि पिंपरी-चिंचवड मनपा निवडणूक राष्ट्रवादीने एकत्र लढवली होती. तसेच जिल्हा परिषद निवडणुकीसाठीही अनेक ठिकाणी दोन्ही गट एकत्र आले होते. अजित पवारांच्या निधनानंतर आता शरद पवार यांनी प्रथमच या विषयावर भाष्य केले आहे. तसेच अजित पवारांचे अकाली निधन हा राज्यावरील मोठा आघात असल्याचेही ते म्हणाले.
बारामती येथे शरद पवार यांनी आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदी होणारा शपथविधी, दोन्ही राष्ट्रवादींचे एकत्रीकरण आणि अजित पवारांच्या निधनामुळे बसलेला आघात, या विषयांवर आपल्या भावना व्यक्त केल्या.
दरम्यान आज सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत, याबद्दल आपल्याला कल्पना नसल्याचे शरद पवार म्हणाले. आज सकाळी आपल्याला उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीबाबत कळले. हा त्यांच्या पक्षातील (अजित पवारांची राष्ट्रवादी) अंतर्गत प्रश्न असून त्यांनी त्याबाबत निर्णय घेतला असावा, असेही ते म्हणाले.
विलीनीकरणावरही भाष्य
राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार होते, आता त्याचे पुढे काय होणार? असा एक प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “आमच्या आणि अजित पवारांच्या पक्षाने एकत्र काम करण्यासंबंधी एकमात झाले होते. यासाठी अनेक बैठका झाल्या. १२ तारखेला यासंबंधी निर्णय जाहीर करायचा होता आणि ही तारीख अजित पवारांनीच दिली होती. मात्र दुर्दैवाने हा अपघात झाला.” अजित पवार चार महिन्यांपासून या प्रक्रियेसाठी प्रयत्नशील होते, असेही शरद पवार म्हणाले.
शरद पवार पुढे म्हणाले, “चार महिन्यांपासून अजित पवार आणि जयंत पाटील हे दोन्ही पक्षाच्या विलीनीकरणाची चर्चा करत होते. मात्र मधेच ही दुर्दैवी घटना घडली. आता ही चर्चेची प्रक्रिया थांबेल असे दिसते.” सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाची सुत्रे आणि उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्याच्या हालचालीवरून दोन्ही गटाच्या एकत्रीकरणाला अडथळा निर्माण होऊ शकतो, असे पवार यांनी सूचित केल्याचे दिसते.
राष्ट्रवादीचे दोन्ही पक्ष एकत्र यावेत, ही अजित पवारांची इच्छा होती. त्यांची इच्छा पूर्ण व्हावी, ही आमची इच्छा आहे, असेही शरद पवार पुढे म्हणाले.
पवार कुटुंब अशा गोष्टींची चर्चा करत नाही
सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत पवार कुटुंबात काही चर्चा झाली होती का? या प्रश्नावर बोलताना शरद पवार म्हणाले की, पवार कुटुंबात अशा गोष्टींची चर्चा होत नाही. तसेच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याबाबत कुणी सांगितले नाही का? असे विचारले असता शरद पवार म्हणाले, “कोण सांगणार?”

