Sharad Pawar Gets Income Tax Notice: महाराष्ट्रामध्ये नव्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्याच्या दिवशीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मागील काही दिवसांपासून राज्यात सुरु असणाऱ्या घडामोडी, नवीन सरकारबरोबरच केंद्रीय यंत्रणांसदंर्भात भाष्य करताना एक मोठा खुलासा केलाय. आपल्यचाला प्राप्तीकरासंदर्भातील नोटीस आल्याचं पवारांनी गुरुवारी स्पष्ट केलं. महाविकास आघाडी सरकार कोसळण्यास कारणीभूत ठरलेले शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पवारांनी केंद्रीय यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर भाष्य करताना ही माहिती दिलीय.

नक्की वाचा >> मुख्यमंत्री शिंदेंवरील अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी मंत्रीमंडळाच्या पहिल्याच बैठकीत मोठा निर्णय; उद्या आणि परवा…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं काय म्हणाले पवार?
“मला प्राप्तिकर विभागाकडून एक प्रेमपत्र आले आह़े  २००४ साली लोकसभा निवडणूक लढवत असताना प्रतिज्ञापत्रात जी माहिती भरली होती, त्याची चौकशी आता करत आहेत,” असे पवार यांनी सांगितले. “२००९ सालीही मी लोकसभेला उभा होतो. २००९ नंतर २०१४ च्या राज्यसभा निवडणुकीला उभा राहिलो. तसेच २०२० च्या राज्यसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्राबद्दलची नोटीसही आता आलेली आहे,” असंही पवार म्हणाले.

केंद्रातील मोदी सरकारला टोला
“इतक्या वर्षांची माहिती गोळा करण्यासाठी लक्ष केंद्रित करणे आणि तेही ठराविक लोकांची माहिती गोळा करणे, म्हणजे धोरणात्मक बदल झालेला दिसतो,” असा टोलाही पवारांनी केंद्राला लगावला.

नक्की वाचा >> “…मग तेव्हा युती का तोडली?”; शिंदेंना मुख्यमंत्री करुन स्वत: उपमुख्यमंत्री झालेल्या फडणवीसांना शिवसेनेचा थेट सवाल

फडणवीसांना टोला
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करणे हे जेवढे धक्कादायक त्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास दिल्लीच्या नेतृत्वाने भाग पाडले हे अधिक धक्कादायक आहे, असंही पवार म्हणाले. “ज्यांनी पाच वर्षे राज्याचे मुख्यमंत्रीपद सांभाळले, आता अडीच वर्षे ते विरोधी पक्षनेते होते, त्यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले, भाजपाच्या वरिष्ठांचा व नागपूरचा हा आदेश असावा आणि नागपूचा आदेश म्हटले की तो तंतोतंत पाळावा लागतो. नागपूरचा आदेश मोडता येत नाही आणि सत्तेत जाण्याची संधी मिळाली तर, ती स्वीकारायची असते, याचे उदाहरण म्हणजे फडणवीस होय,” असा टोलाही पवार यांनी हाणला. 

नक्की वाचा >> “…तर उद्धव ठाकरेंना समर्थन करणाऱ्या त्या १६ आमदारांची आमदारकी धोक्यात येईल”; बंडखोर आमदारांकडून इशारा

शिंदेंनाही कल्पना नसेल
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करणे हा आश्चर्यकारक निर्णय असल्याचे ते म्हणाले. “शिवसेनेतील ३९ आमदारांचे नेतृत्व करणारे शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदापेक्षा अधिकची मागणी केली असेल. त्यामुळे भाजपा नेतृत्वाने हा निर्णय घेतला असेल, कदाचित त्याची कल्पना शिंदेंनाही नसावी,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar gets income tax notice over poll affidavits scsg
First published on: 01-07-2022 at 11:24 IST