मुंबई : अजित पवार यांच्या निधनानंतर सुरू झालेली विलिनीकरणाची चर्चा तुर्तास बाजूला ठेवण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाने घेतली आहे. शरद पवार गटालाच विलिनीकरणाची घाई झाली आहे, असा चुकीचा प्रचार अजित पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी सुरू केल्यामुळे तुर्तास थांबा आणि वाट पहा, अशी भूमिका शरद पवार गटाने घेतल्याचे दिसते.
पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस आमदार रोहित पवार यांनी विलिनीकरणाबाबत १२ फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद घेण्याचे जाहीर केले होते. पण, ती पत्रकार परिषद रद्द केली. त्यानंतर विलिनीकरणाचा विषय काहिसा मागे पडला होता. त्यानंतर राष्ट्रवादी मासिकात प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी लिहिलेल्या लेखामुळे हा विषय पुन्हा चर्चेत आला. शुक्रवारी पुन्हा आमदार हिरामण खोसकर यांनी विलिनीकरण गरजेचे असल्याचे सांगितले. त्याला प्रत्त्युत्तर देताना मंत्री छगन भुजबळ यांनी विलिनीकरणाची घाई का झाली आहे, असा सवाल केला होता.
त्यामुळे शिंदे यांनी शनिवारी प्रसार माध्यमांशी बोलताना विलिनीकरणाच्या विषयावर आता आम्ही बोलणार नाही. अजित पवार यांचीच पुन्हा एकत्र येण्याची इच्छा होती. त्या बाबत चर्चाही झाली होती. त्यामुळेच पुणे, सातारा जिल्हा परिषदेत शरद पवार गटाचे उमेदवार घड्याळाच्या चिन्हावर लढले. आता अजित पवार गटाच्या वरिष्ठांना विलिनीकरण नको असल्याचे दिसते. त्यांची वक्तव्ये तशीच आहेत. त्यामुळे आम्हीही विलिनीकरणाचा मुद्दा बाजूला ठेवून पुन्हा पक्ष बांधणीसाठी मैदानात उतरणार आहे. विलिनीकरणाबाबत त्यांनी भूमिका घ्यावी. राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि भाजपला काय सांगायचे ते त्यांना पहावे. आता आम्ही विलिनीकरणाच्या मुद्यावर भाष्य करणार नाही, असेही शिंदे म्हणाले.
राष्ट्रीय अध्यक्ष निवडीनंतर पुन्हा चर्चा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पुढील पंधरा दिवसांत राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता आहे. त्यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर सर्वांशी चर्चा करून, सर्वांना विश्वासात घेऊन सोयीनुसार नंतर विलिनीकरणाचा निर्णय घेण्याचा विचार दोन्ही गटांतील शरद पवार यांना मानणाऱ्या नेत्यांचा दिसून येतो आहे.
आमचे उमेदवार घड्याळाच्या चिन्हावर
तुर्तास विलिनीकरणाच्या मुद्यावर भाष्य न करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आम्हालाच गरज आहे, असे भासविले जात आहे. अजित पवार यांची इच्छा पूर्ण करायची की नाही, हा निर्णय त्यांनी घ्यावयाचा आहे. विलिनीकरणाचा निर्णय झाल्यामुळेच जिल्हा परिषदेला आमचे उमेदवार घड्याळाच्या चिन्हा निवडणूक लढले होते, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिले.
