Sunetra Pawar Post: प्रकृतीच्या कारणास्तव शरद पवार बारामती पोटनिवडणुकीच्या मतदानाला उपस्थित राहू शकणार नाहीत. शरद पवार यांनी स्वत: याबाबत एक्सवर पोस्ट करुन माहिती दिली. पवारांना मंगळवारी उपचारासाठी मुंबईत ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यांनंतर आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शरद पवार यांच्यासाठी पोस्ट करत, त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना केली आहे.

मंगळवारी पार पडली सांगता सभा

अजित पवार यांचे विमान अपघातात अकाली निधन झाल्यानंतर रिक्त झालेल्या बारामती मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उद्या (२३ एप्रिल) मतदान होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी सांगता सभा पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सभेला हजेरी लावत बारामतीकरांना विक्रमी मतदान करण्याचे आवाहन केले. सुप्रिया सुळे यांनी महाविकास आघाडीच्या वतीने सुनेत्रा पवार यांना पाठिंबा जाहीर करत ‘वहिनींना साथ द्या’, अशी भावनिक साद घातली. शरद पवारांनी प्रकृतीच्या कारणास्तव या निवडणुकीसाठी मतदानाला हजर राहू शकणार नसल्याचे सांगितले.

सुनेत्रा पवारांसाठी पोस्ट

यानंतर आता सुनेत्रा पवार यांनी शरद पवारांसाठी पोस्ट लिहली आहे. शरद पवार मतदानास उपस्थित राहू शकणार नाहीत. मात्र त्यांचे आशीर्वाद माझ्यासाठी आणि बारामतीकरांसाठी लाखमोलाचे आहेत, असे सुनेत्रा पवारांनी म्हटले आहे. बारामतीकर त्यांच्या आवाहनाला नक्कीच उत्स्फूर्त प्रतिसाद देतील अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी पवारांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना केली.

शरद पवार काय म्हणाले होते?

दरम्यान, शरद पवार यांनी मंगळवारी बारामतीत पोटनिवडणुकासाठी मतदान करु शकणार नसल्याचे स्पष्ट केले. प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल व्हावे लागले. सक्तीच्या विश्रांतीच्या कारणास्तव मुबंईबाहेर जाण्यास मनाई केल्याचे पवार यांनी सांगितले. “नाईलाजास्तव मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित रहावे लागत आहे. आमच्या पक्षाने सुनेत्रा पवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. मतदारांना अजित पवारांना मतदान करुन श्रद्धांजली अर्पण करावी”, असे आवाहन शरद पवार यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमधून केले.

मतदारांना भावनिक आवाहन

मंगळवारी बारामातीत पार पडलेल्या सांगता सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावत मतदारांना विक्रमी मतदान करण्याचे आवाहन केले. हा विजय संपूर्ण भारतात गाजला पाहिजे, असेही फडणवीस म्हणाले. या सभेला महायुती सरकारमधील नेते, मंत्र्यांनी हजेरी लावली होती. तसेच, महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे यांनी उपस्थिती लावत मतदारांना मतदान करण्यासाठी भावनिक साद घातली.