Sharad Pawar Health Update : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रमुख आणि खासदार शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना बारामती येथील गोविंदबाग या त्यांच्या निवासस्थानातून त्यांना पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काही वेळापूर्वी रुग्णालयात जाऊन शरद पवारांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत डॉ. लोढा यांनी काय सांगितलं?
शरद पवारांना थकवा आला आहे. त्यांना छातीत कफ झाला आहे त्यांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. शरद पवारांची प्रकृती स्थिर आहे. तपासण्यांचा अहवाल आल्यानंतर आम्ही पुढचा निर्णय घेऊ. शरद पवारांना किती दिवस रुग्णालयात रहावं लागेल याचा निर्णयही या अहवालानंतरच घेतला जाईल. शरद पवारांची प्रकृती आत्ता स्थिर आहे. काळजी करण्यासारखं आत्ता तरी काही नाही. शरद पवार यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलेलं नाही. तर शरद पवार हे प्रायव्हेट रुममध्ये आहेत अशी माहिती रुबी रुग्णालयाचे डॉ. लोढा यांनी माध्यमांना दिली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रुबी रुग्णालयात जाऊन शरद पवारांची भेट घेतली. त्यांच्यासह जय पवार आणि पार्थ पवारही होते.
सुप्रिया सुळेंची पोस्ट काय?
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “बाबांना खोकला आहे, छातीत कफ झाला आहे. पाच दिवस त्यांना औषध घ्याला सांगितलं आहे. बाकी सगळ्या चाचण्या केल्या त्या सामान्य आहेत. तुम्हा सगळ्यांच्या सदिच्छा आणि आधार यासाठी मी तुमची आभारी आहे.” या आशयाची पोस्ट सुप्रिया सुळेंनी केली आहे.
शरद पवारांची प्रकृती बिघडली
शरद पवार बारामती येथील त्यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी होते. त्यांची प्रकृती अचान बिघडली. त्यांचा घसा दुखतो आहे तसंच कफाचाही त्रास जाणवतो आहे त्यामुळे त्यांना श्वास घ्यायला काही प्रमाणात त्रास होतो आहे. त्यांची प्रकृती जास्त बिघडल्याने त्यांना तातडीने पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शरद पवारांचे पुतणे श्रीनिवास पवार यांनी सांगितलं शरद पवार यांना होणारा कफाचा त्रास रविवारी रात्रीपासून वाढला आहे, त्यामुळेच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर गेल्या काही दिवसांपासून ते आपल्या बारामती, मुंबई आणि पुण्यातील घरी दौरे करत होते. तर, राज्यभरातून राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांच्या भेटीसाठी, त्यांचे सांत्वन करण्यासाठी येत होते. दरम्यान, आज शरद पवार यांना खोकल्याचा त्रास जाणवू लागल्याने पुण्यातील रुबी क्लिनिकमध्ये तपासणीसाठी नेण्यात आलं आहे.

